लांजा आणि निवळी येथील उड्डाणपुलांची कामेही अंतिम टप्प्यात; ईगल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या वेगामुळे चौपदरीकरणाच्या कामाला गती
रत्नागिरी : पाली उड्डाणपूल अखेर प्रत्यक्ष वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असून, यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील या भागातील वाहतूककोंडीचा मोठा प्रश्न सुटला आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरण आणि चौपदरीकरणाच्या कामांतर्गत ईगल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीमार्फत उभारण्यात आलेल्या या उड्डाणपुलावरून वाहनांची रहदारी सुरू झाल्याने दैनंदिन प्रवाशांचा तसेच चाकरमान्यांचा प्रवास आता अधिक सुखकर आणि सुरक्षित झाला आहे.
पाली उड्डाणपुलामुळे वाहतूककोंडीतून कायमची सुटका
गेल्या काही वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाच्या प्रलंबित कामांमुळे कोकणात प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य नागरिक, चाकरमाणी आणि स्थानिक वाहनधारकांना तीव्र वाहतूककोंडीसह खड्ड्यांच्या समस्येला सामोरे जावे लागत होते. मात्र, ईगल कंपनीने कामाचा वेग वाढवल्याने महामार्गावरील अनेक टप्प्यांचे चित्र झपाट्याने बदलू लागले आहे. पाली येथील हा उड्डाणपूल पूर्ण होऊन वाहतूक सुरू झाल्याने वाहनचालकांनी मोठा सुटकेचा निश्वास सोडला आहे.
लांजा आणि निवळी येथील कामांना युद्धपातळीवर वेग
मुंबई-गोवा महामार्गाचे काम निकडीचे बनलेले असतानाच, ईगल कंपनीकडून इतर महत्त्वाच्या टप्प्यांवरही वेगाने कामे हाती घेण्यात आली आहेत. या मोहिमेचा भाग म्हणून लांजा आणि निवळी येथील उड्डाणपुलांची तसेच रस्त्यांची कामे सध्या युद्धपातळीवर सुरू आहेत. प्रशासन आणि संबंधित कंत्राटदार कंपनीने या कामांना अधिक गती दिल्याचे दिसून येत आहे.
दिवस-रात्र कामांमुळे महामार्ग होणार अधिक वेगवान
सध्या सुरू असलेल्या या प्रकल्पांतर्गत निवळी येथे ८०० मीटर लांबीच्या उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर आहे. याशिवाय, लांजा येथे तब्बल २ किलोमीटर लांबीच्या भव्य उड्डाणपुलाचे व रस्त्याचे काम ईगल कंपनीच्या वतीने दिवस-रात्र सुरू आहे. लांजा (२ किमी) आणि निवळी (८०० मीटर) येथील हे उड्डाणपूल पूर्ण झाल्यानंतर कोकणातील हा अत्यंत वर्दळीचा महामार्ग अधिक सुरक्षित, अडथळामुक्त आणि कमी वेळेत पार करणे शक्य होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:35 29-07-2026














