NCP Merger News: राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरेंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, नेमकं कारण काय?

सोमवारी अमित शाह, तर मंगळवारी पंतप्रधान मोदी; सुनील तटकरेंच्या दिल्लीतील गाठीभेटींमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

नवी दिल्ली : NCP Merger News च्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीतून एक अत्यंत महत्त्वाची राजकीय बातमी समोर आली आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे विलिनीकरण होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. या भेटीचे फोटोही समोर आले असून, याआधी सोमवारी तटकरेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट घेतली होती.

विविध विकासकामांवर चर्चा; तटकरेंनी सोशल मीडियावर दिली माहिती

सुनील तटकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर या संदर्भातील छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत. नवी दिल्ली येथे देशाचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन विविध विकासकामांच्या संदर्भात विस्तृत चर्चा केली व त्यांचे मार्गदर्शन घेतले, अशी माहिती तटकरे यांनी दिली आहे. भेटीदरम्यान तटकरे हे पंतप्रधान मोदींना विविध मागण्यांचे एक निवेदन देत असल्याचेही या छायाचित्रांमध्ये पाहायला मिळत आहे.

शरद पवारांच्या भेटीनंतर विलिनीकरणाच्या चर्चांना वेग

यापूर्वी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतलेली भेट आणि दिल्लीत प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांना पुन्हा उधाण आले होते. मात्र, त्या भेटीनंतर शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिले होते की, सुप्रिया सुळे आणि त्यांनी पंतप्रधानांसोबत NEET प्रश्नपत्रिका लीक प्रकरण, विद्यार्थ्यांच्या मागण्या, शेतकऱ्यांच्या समस्या, जलव्यवस्थापन आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली होती.

पक्षातील नेते NDA सोबत जाण्यास उत्सुक?

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येऊन भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (NDA) सहभागी होऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. शरद पवारांच्या पक्षातील बहुतांशी नेते NDA मध्ये जाण्यास तयार असल्याची माहिती समोर येत आहे, तर काही नेते ‘इंडिया’ आघाडीसोबतच राहण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतात का आणि शरद पवारांचा पक्ष NDA मध्ये सामील होतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:02 29-07-2026