प्रशासनाकडून नदीपात्र व धरण परिसरात प्रवेश बंदी; नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन
राजापूर (रत्नागिरी) : Rajapur Arjuna Dam संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, राजापूर तालुक्याच्या पूर्व भागातील महत्त्वाचा असलेला करक येथील ‘अर्जुना पाटबंधारे प्रकल्प’ यंदाच्या पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने म्हणजेच १०० टक्के भरला आहे. धरणाची पाणीपातळी पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचल्याने खबरदारीचा उपाय म्हणून सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर प्रकल्प परिसरातील नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ती काळजी घ्यावी, अशा सूचना तालुका प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.
२.४१ क्यूसेक्सने विसर्ग; धरण परिसरात प्रवेश निषिद्ध
लघु पाटबंधारे (ल. पा.) विभागाने दिलेल्या माहितीनुसार, धरणाच्या सुरक्षिततेसाठी सांडव्यावरून २.४१ क्यूसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून धरण आणि त्याच्या अनुषंगिक परिसरात नागरिकांना प्रवेश निषिद्ध करण्यात आला आहे. सुरक्षेवर लक्ष ठेवण्यासाठी धरण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी आणि पर्यटकांनी नदीपात्र, नाले तसेच धरण क्षेत्रात जाऊ नये, असे स्पष्ट निर्देश प्रशासनाने दिले आहेत.
पूर्व भागासाठी महत्त्वपूर्ण प्रकल्प; पाईपलाईनचे काम अंतिम टप्प्यात
राजापूर तालुक्यातील सर्वात मोठा लघु पाटबंधारे प्रकल्प म्हणून अर्जुना प्रकल्पाची ओळख आहे. या प्रकल्पातून पूर्व भागातील गावांसाठी बंदिस्त पाईपलाईनचे काम मोठ्या प्रमाणावर मार्गी लागले आहे. परिसरातील नागरिकांना शेती आणि पिण्यासाठी मुबलक पाणी उपलब्ध करून देणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. मागील काही वर्षांपासून हा प्रकल्प दरवर्षी पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने भरत आहे.
अर्जुना धरणाची ताजी स्थिती :
- प्रकल्प : अर्जुना मध्यम प्रकल्प (करक, ता. राजापूर, जि. रत्नागिरी)
- पाणीपातळी : १७७.०५ मीटर
- उपयुक्त पाणीसाठा : ७२.५६ द.ल.घ.मी. (१००% साठा)
- आजचा पाऊस : ७४ मिमी
- १ जून २०२६ पासून एकूण पाऊस : २००१ मिमी
- सांडवा विसर्ग : २.४१ क्यूसेक्स
- विमोचक विसर्ग : ०.०० क्यूसेक्स
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:32 29-07-2026














