Priyanka Gandhi Lok Sabha speech: “तुम्हाला देशातील तरुणांची एवढी भीती का वाटते?”; लोकसभेत प्रियंका गांधींचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

परीक्षा सुधारणा विधेयकावरील चर्चेदरम्यान सरकारवर प्रश्नांची सरबत्ती; दिल्लीतील लाठीहल्ल्यात जखमी विद्यार्थिनीच्या आईचा मांडला हृदयद्रावक अनुभव

नवी दिल्ली : Priyanka Gandhi Lok Sabha speech संदर्भात संसदेच्या पटलावरून एक मोठी बातमी समोर आली आहे. लोकसभेत ‘परीक्षा सुधारणा विधेयका’वरील चर्चेदरम्यान काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी सत्ताधारी भाजप सरकारवर अत्यंत आक्रमक शब्दांत हल्लाबोल केला. “माजी शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी ‘जिंदाबाद’च्या घोषणा देत संसदेत त्यांचे स्वागत केले. एकीकडे महाराष्ट्रात पेपरफुटीने कंटाळलेली तरुण मुलगी आत्महत्या करते तिचे कुटुंब शोकाकूल आहे, तर दुसरीकडे तुम्ही माजी शिक्षणमंत्र्यांचा सत्कार करत आहात! हा कोणता अहंकार आहे? जिथे लाज वाटायला हवी होती, तिथे उत्सव साजरा केला जातोय,” अशा घणाघाती शब्दांत प्रियंका गांधी यांनी सरकारचा समाचार घेतला.

“देशातील तरुणांची एवढी भीती का वाटते?”

प्रियंका गांधी यांनी सरकारला धारेवर धरत थेट सवाल केला की, “तुम्हाला या देशातील तरुणांची एवढी भीती का वाटते? आणि विद्यार्थ्यांवर लाठीहल्ला करून त्यांचा आवाज दाबण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?” पुढे बोलताना त्यांनी गंभीर आरोप केला की, “पंतप्रधानांनी अशा व्यक्तीला शिक्षणमंत्री केले आहे ज्यांनी एका गरोदर महिलेच्या बलात्कार्यांना सोडवण्याचे समर्थन केले होते. या निर्णयाद्वारे देशातील करोडो मुलींना सरकार कोणता संदेश देऊ इच्छिते?”

सरकारच्या नाकर्तेपणामुळे विद्यार्थी नैराश्याच्या गर्तेत

NEET परीक्षेतील गोंधळावर बोट ठेवताना प्रियंका गांधी म्हणाल्या, “NEET ची परीक्षा देणारे बहुतांश विद्यार्थी हे ग्रामीण भागातील आहेत. मुलांच्या शिक्षणासाठी त्यांची आई दागिने विकत आहे, तर वडील जमीन गहाण ठेवत आहेत. मात्र, सरकारच्या नाकर्तेपणामुळे ही मुले आज नैराश्याच्या गर्तेत ढकलली गेली आहेत. या देशात कष्टापेक्षा पैशालाच जास्त महत्त्व आहे, असाच संदेश प्रामाणिक विद्यार्थ्यांना दिला जात आहे.” तसेच, शिक्षण व्यवस्थेत आज आरएसएसने (RSS) घुसखोरी केली असून सरकारने शिक्षणावरील खर्चात मोठी कपात केल्याचा आरोपही त्यांनी केला.

रुग्णालयातील तो हृदयद्रावक अनुभव सभागृहात मांडला

आपल्या भाषणात प्रियंका गांधी यांनी दिल्लीतील आंदोलनादरम्यान पोलिसांच्या लाठीहल्ल्यात जखमी झालेल्या एका विद्यार्थिनीचा आणि तिच्या आईचा आर. एम. एल. (RML) रुग्णालयातील अनुभव अत्यंत भावूकपणे मांडला. प्रियंका गांधी म्हणाल्या, “आम्ही जेव्हा आयसीयूच्या दाराशी पोहोचलो, तेव्हा त्या मुलीच्या आईने आम्हाला थरथरत्या आवाजात विचारले, ‘तुम्ही इथे कशाला आला आहात? सकाळपासून मोठे मोठे नेते एकापाठोपाठ एक इथे येत आहेत आणि व्हिडिओ बनवत आहेत. अहो, माझ्या मुलीची ही अवस्था ज्यांच्यामुळे झाली आहे, ते लोकही इथे येऊन गेले… का करताय हे सर्व?'” या पीडित आईची ही उद्विग्नता संपूर्ण देशाची डोळे उघडवणारी आहे, असे सांगत प्रियंका गांधी यांनी सरकारच्या संवेदनशीलतेवर कठोर ताशेरे ओढले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:31 29-07-2026