शाळेत जाणाऱ्या महिलेला अडवून २५ हजारांचे दागिने लांबवले; काळ्या रेनकोट अन् हेल्मेटधाऱ्या भामट्याचा शोध सुरू
Guhagar : गुहागरमध्ये दिवसाढवळ्या महिला पालकाचे मंगळसूत्र हिसकावले; अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखलरत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात दिवसाढवळ्या जबरी चोरीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या चिमुकलीला शाळेतून आणण्यासाठी पायी चाललेल्या एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात दुचाकीस्वाराने हिसकावून नेल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून गुहागर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलीला शाळेतून आणण्यासाठी जाताना घडला प्रकार
गुहागर तालुक्यातील वाकी स्वातंत्र्यवाडी येथील रहिवासी असलेल्या सौ. अवनी समीर पागडे (वय ३६ वर्षे) या गुरुवारी दुपारी आपल्या किराणा मालाचे दुकान बंद करून मुलीला शाळेतून आणण्यासाठी निघाल्या होत्या. दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास त्या आरे ते पाटपण्हाळे जाणाऱ्या रस्त्याने पायी जात असताना ही दुर्दैवी घटना घडली.
काळा रेनकोट आणि हेल्मेट परिधान करून आला भामटा
फिर्यादी महिला रस्त्याने जात असताना मागून आलेल्या एका अज्ञात दुचाकीस्वाराने त्यांना गाठले. आरोपीने अंगात काळ्या रंगाचा रेनकोट आणि डोक्यावर हेल्मेट परिधान केले होते. त्याने काळ्या रंगाच्या दुचाकीवरून येत अत्यंत चालाखीने अवनी पागडे यांच्या गळ्यातील सोन्याचे एकपदरी मंगळसूत्र हिसकावले. चोरी केल्यानंतर आरोपी पाटपण्हाळे गावच्या दिशेने वेगाने दुचाकीवरून पसार झाला.
२५ हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र लांबवले
चोरीस गेलेल्या दागिन्यामध्ये सुमारे ५ ग्रॅम वजनाचे, काळे व सोन्याचे मणी गुंफलेले आणि एक डवळी (वाटी) असलेले एकपदरी सोन्याचे मंगळसूत्र आहे. या दागिन्याची अंदाजे किंमत २५,००० रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. घटनेनंतर फिर्यादी यांनी गुहागर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.
आरोपीचा शोध घेण्यासाठी गुहागर पोलिसांकडून तपास सुरू
या प्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३०४ (२) नुसार गु.र.नं. ६८/२०२६ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घटनास्थळाची पाहणी करून पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर माहितीच्या आधारे काळ्या दुचाकीवरील अज्ञात भामट्याचा शोध सुरू केला आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे महिला वर्ग आणि स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसडले आहे.













