मुसळधार पावसामुळे जुना घाटमार्ग धोकादायक; वर्षभरापूर्वी नूतनीकरण केलेल्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
खेड / रत्नागिरी: Mumbai Goa Highway Kashedi Ghat Damage संदर्भात एक अतिशय चिंताजनक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील (NH 66) रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांना जोडणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या कशेडी घाटात मुसळधार पावसामुळे रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. महामार्गालगतच्या साईड पट्टीचा भराव पुराच्या आणि पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेल्याने रस्ता खचला असून रस्त्याला आधार देणारे लोखंडी गर्डर थेट हवेत लटकलेल्या अवस्थेत दिसून येत आहेत.
अवजड वाहतुकीमुळे मोठा अपघात घडण्याची भीती रस्त्याचा भराव वाहून गेल्यामुळे महामार्गाचा काही भाग अतिशय कमकुवत झाला आहे. या स्थितीतून जर अवजड वाहनांची ये-जा सुरूच राहिली किंवा पुन्हा मुसळधार पाऊस झाला, तर महामार्गाचा मोठा हिस्सा कोसळून दरीत वाहून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पावसाळ्याच्या दिवसांत या मार्गावरून दररोज हजारो वाहने धावत असल्याने वाहनचालकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे.
वर्षभरापूर्वी नूतनीकरण झालेला जुना घाटमार्गही धोक्यात विशेष म्हणजे, कशेडी बोगदा (Kashedi Tunnel) कार्यान्वित झाल्यानंतर त्याला पर्यायी मार्ग म्हणून वापरल्या जाणाऱ्या जुन्या कशेडी घाटमार्गाचे गेल्याच वर्षी डांबरीकरण आणि नूतनीकरण करण्यात आले होते. मात्र, एकाच वर्षात पावसाळ्यात या रस्त्याची अशी अवस्था झाल्यामुळे रस्ते विकास यंत्रणा आणि ठेकेदारांच्या कामाच्या दर्जावर व गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
स्थानिकांकडून तातडीने सुरक्षेच्या उपाययोजनांची मागणी रस्ता खचल्याचे आणि गर्डर हवेत लटकल्याचे निदर्शनास आल्यानंतर स्थानिक नागरिक व नियमित प्रवास करणाऱ्या वाहनचालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. भविष्यात कोणतीही मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरनाने (NHAI) आणि प्रशासनाने या ठिकाणी तातडीने कायमस्वरूपी दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, तसेच धोकादायक भागात योग्य त्या सुरक्षा यंत्रणा उभ्या कराव्यात, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:52 31-07-2026














