कुवारबाव ग्रामपंचायतीचे तालुका पातळीवर मोठे यश; महिला सक्षमीकरणाचे उपक्रम ठरले मार्गदर्शक
रत्नागिरी: कुवारबाव ग्रामपंचायतीने आदिशक्ती अभियानात उल्लेखनीय कामगिरी करत रत्नागिरी तालुकास्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे. महिला व बालविकास विभागाच्या वतीने २२ मे २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत राज्यभरात हे अभियान राबवण्यात आले होते. प्रस्थापित नसलेल्या आणि कष्टकरी वर्गाची मोठी संख्या असलेल्या कुवारबाव ग्रामपंचायतीने सर्व आव्हानांवर मात करत या स्पर्धेत हे यश मिळवले आहे.
शासनाच्या महिला व बालविकास विभागाद्वारे आयोजित या अभियानाचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील महिलांच्या विविध समस्या जाणून घेणे, त्यांना सामाजिकदृष्ट्या सक्षम करणे आणि पंचायत राज व्यवस्थेमध्ये महिला नेतृत्वाचा सहभाग वाढवणे हा होता. या अभियानांतर्गत निश्चित करण्यात आलेल्या १३ विविध निकषांच्या आधारे राज्य, जिल्हा आणि तालुका पातळीवर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सुमारे सात ते आठ महिन्यांच्या या कालावधीत विविध प्रबोधनात्मक आणि कल्याणकारी उपक्रम राबवणे सर्वच ग्रामपंचायतींसाठी महत्त्वाचे आणि आव्हानात्मक होते.
कष्टकरी जनतेचे प्राबल्य असलेल्या कुवारबाव ग्रामपंचायतीसाठी या अभियानात सहभागी होऊन शेवटपर्यंत सातत्य टिकवून ठेवणे कठीण काम होते. मात्र, आदिशक्ती अभियानाच्या अध्यक्षा सौ. स्नेहल वैशंपायन यांनी सहकाऱ्यांना सोबत घेऊन सर्व १३ निकषांनुसार विविध उपक्रम अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने यशस्वीरीत्या पूर्ण केले. त्यांच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळेच कुवारबाव ग्रामपंचायतीने तालुका पातळीवर दुसऱ्या क्रमांकाच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले.
हे अभियान यशस्वी करण्यासाठी प्रशासिका सौ. समीक्षा तळेकर आणि ग्राम विस्तार अधिकारी श्री. बुंदे यांचे मोलाचे मार्गदर्श लाभले. तसेच अध्यक्षा सौ. स्नेहल वैशंपायन यांच्यासह सचिव सौ. विभावरी कोळेकर, सदस्य प्रकाश शिंदे, अविनाश खडपकर, मधु शिवलकर, स्वाती लांजेकर आणि पोलीस पाटील सौ. वीणा पटवर्धन यांनी विशेष मेहनत घेतली. कुवारबाव ग्रामपंचायतीने मिळवलेल्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून प्रशासकीय अधिकारी आणि नागरिकांकडून संपूर्ण टीमचे विशेष अभिनंदन केले जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:21 01-08-2026














