रत्नागिरी: स्वच्छता मोहिमेदरम्यान कंत्राटी कर्मचाऱ्याचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू

गोगटे-जोगळेकर कॉलेज मैदानावर अपघात: सर्पदंशाने नगर परिषदेच्या कर्मचाऱ्याचा अंत

रत्नागिरी: रत्नागिरीतील स्वच्छता मोहिमेदरम्यान एका कंत्राटी कर्मचाऱ्याचा फुरसे जातीच्या अतिविषारी सापाने दंश केल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या २ ऑगस्ट रोजी होणाऱ्या रत्नागिरी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या पटांगणावर साफसफाईचे काम सुरू असताना हा अपघात घडला. काशिनाथ लक्ष्मण गोताड (वय मूळ रा. चांदोर, सध्या रा. फगरवठार, परटवणे, ता. जि. रत्नागिरी) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव असून ते रत्नागिरी नगर परिषदेमध्ये कंत्राटी सेवेत कार्यरत होते.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या पटांगणावर ‘छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान’ कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. या शासकीय कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून शुक्रवारी सकाळपासून नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांकडून महाविद्यालय परिसर आणि मैदानावरील गवत व झाडीझुडपांची साफसफाई केली जात होती. हे काम सुरू असतानाच अचानक काशिनाथ गोताड यांच्या पायाला फुरसे जातीच्या विषारी सापाने दंश केला.

सापाचा दंश होताच काशिनाथ गोताड जागेवरच कोसळले. तेथे उपस्थित असलेल्या सहकाऱ्यांनी कोणतीही वेळ न दवडता त्यांना तातडीने उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, शरीरात विष वेगाने पसरल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.

शासकीय कार्यक्रमाच्या तयारीचे कर्तव्य बजावत असताना घडलेल्या या अपघातामुळे नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे गोताड कुटुंबीयांवर मोठा आघात झाला असून परिसरातून तीव्र दुःखाची भावना व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाची अधिकृत नोंद घेण्याचे काम स्थानिक प्रशासकीय यंत्रणांकडून सुरू असून पुढील आवश्यक कायदेशीर तपास केला जात आहे

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:39 01-08-2026