सीएसएमटी, एलटीटी, पुणे आणि दिवा येथून सुटणार विशेष गाड्या; ‘यूटीएस’वर अनारक्षित तिकीट उपलब्ध
रत्नगिरी: कोकण रेल्वे गणेशोत्सव स्पेशल ट्रेनबाबत मध्य रेल्वेने चाकरमान्यांसाठी अतिशय दिलासादायक आणि महत्त्वाची घोषणा केली आहे. येत्या गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची होणारी तुफान गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने कोकण रेल्वे मार्गावर तब्बल २४६ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्यांचे आरक्षण १ ऑगस्ट २०२६ पासून टप्प्याटप्प्याने सुरू होत असून गणेशभक्तांना प्रवासाचे नियोजन करणे आता सहज शक्य होणार आहे.
मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या २४६ विशेष गाड्यांमध्ये १८४ आरक्षित (Reserved) गाड्या आणि ६२ अनारक्षित (Unreserved) मेमू (MEMU) गाड्यांचा समावेश आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी वेगवेगळ्या प्रमुख स्थानकांवरून या फेऱ्या सोडल्या जातील. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून ९८ फेऱ्या, लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) येथून ७६ फेऱ्या, पुणे येथून १० फेऱ्या आणि दिवा येथून ६२ अनारक्षित मेमू फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. या गाड्या सीएसएमटी-सावंतवाडी रोड, सीएसएमटी-रत्नागिरी, एलटीटी-सावंतवाडी रोड, एलटीटी-रत्नागिरी, एलटीटी-मडगाव, पुणे-रत्नागिरी तसेच दिवा-खेड आणि दिवा-चिपळूण या प्रमुख मार्गांवर धावतील. यामध्ये काही गाड्या दैनंदिन, काही साप्ताहिक, द्वि-साप्ताहिक तर काही आठवड्यातील ठराविक दिवशी चालवण्यात येणार आहेत.
आरक्षित विशेष गाड्यांचे बुकिंग प्रवाशांना सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर (PRS) आणि आयआरसीटीसी (IRCTC) च्या संकेतस्थळावर करता येणार आहे. आरक्षणाच्या वेळापत्रकानुसार, १ ऑगस्ट २०२६ रोजी गाडी क्रमांक ०११५३, ०१४४५, ०११६७ आणि ०१४४७ चे बुकिंग सुरू होईल. २ ऑगस्ट रोजी गाडी क्रमांक ०११६५ आणि ०११८५, तर ३ ऑगस्ट रोजी गाडी क्रमांक ०११०३, ०११२९, ०११५१, ०११७१ आणि ०११३१ या गाड्यांचे बुकिंग उघडणार आहे.
दुसरीकडे, ६२ अनारक्षित मेमू गाड्यांच्या तिकिटांसाठी प्रवाशांना यूटीएस (UTS) प्रणाली तसेच ‘रेलवन’ (RailOne) ॲपचा वापर करता येईल. या सर्व विशेष गाड्यांच्या सविस्तर वेळापत्रकाची आणि थांब्यांची माहिती भारतीय रेल्वेच्या www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळावर तसेच NTES मोबाइल ॲपवर उपलब्ध करण्यात आली आहे, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:39 01-08-2026














