रत्नागिरी जिल्ह्यात ५० टक्के अॅग्रीस्टॅक पूर्ण; कर्जमुक्ती आणि ५० हजारांच्या प्रोत्साहन लाभासाठी प्रक्रिया वेगवान
रत्नागिरी: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा करण्यासाठी अॅग्रीस्टॅक (AgriStack) आणि ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असून, रत्नागिरी जिल्ह्यात सध्या ५० टक्के अॅग्रीस्टॅकचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिली आहे. ही दोन्ही कामे पूर्ण होताच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर योजनेचा लाभ थेट वर्ग केला जाईल, असे त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या पत्रपरिषदेला जिल्हा उपनिबंधक राम कुलकर्णी यांचीही प्रमुख उपस्थिती होती. यावेळी योजनेच्या निकषांची माहिती देताना जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी सांगितले की, अल्पमुदत पीक कर्जमुक्ती योजनेअंतर्गत १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत घेतलेल्या कर्जाची ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकबाकी असलेल्या आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत त्याची पुनर्रचना किंवा परतफेड केलेल्या शेतकरी खात्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज २ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांनी २ लाखांवरील अतिरिक्त रक्कम प्रथम बँकेत जमा करणे आवश्यक आहे; त्यानंतरच त्यांना उर्वरित २ लाख रुपयांच्या कर्जमुक्तीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.
यासोबतच, नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी विशेष प्रोत्साहनपर योजनेची घोषणाही प्रशासनाकडून करण्यात आली आहे. सन २०२२-२३, २०२३-२४ आणि २०२४-२५ या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन वर्षांत घेतलेल्या पीक कर्जाची विहित मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कमाल ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार आहे. जर शेतकऱ्याची एकूण कर्ज रक्कम ५० हजार रुपयांपेक्षा कमी असेल, तर त्यांनी प्रत्यक्षात परतफेड केलेली रक्कम किंवा किमान ५ हजार रुपये यांपैकी जे जास्त असेल ती रक्कम प्रोत्साहन म्हणून थेट खात्यात जमा केली जाईल.
शेतकऱ्यांनी या योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी प्रशासकीय स्तरावर अॅग्रीस्टॅक नोंदणीचा वेग वाढवण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी वेळेत अॅग्रीस्टॅक आणि ई-केवायसी प्रमाणीकरण पूर्ण करून घ्यावे, जेणेकरून शासनाचा निधी थेट त्यांच्या बँक खात्यात विनाअडथळा वर्ग करता येईल, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:46 01-08-2026














