मासेमारी हंगामावर हवामानाचे सावट; १२ सागरी मैलांपुढील खोल समुद्रात परवानगी तरी ३ ऑगस्टपर्यंत ‘यलो अलर्ट’
रत्नागिरी: Ratnagiri Fishing Season (रत्नागिरी मासेमारी हंगाम) शनिवार १ ऑगस्ट पासून अधिकृतपणे सुरू होत असून राज्य शासनाने किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपुढील खोल समुद्रात मासेमारी करण्यास परवानगी दिली आहे. तब्बल ६० दिवसांच्या प्रदीर्घ बंदीनंतर १ ऑगस्ट रोजी नव्या हंगामाचा प्रारंभ होत असला, तरी किनारपट्टी भागात सुरू झालेल्या वादळी पावसाने मच्छिमारांसमोर आव्हान उभे केले आहे. हवामान विभागाने ३ ऑगस्ट पर्यंत पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी केल्याने पुढील तीन ते चार दिवस प्रत्यक्ष मासेमारी सुरू होण्याची शक्यता धूसर बनली आहे.
पावसाळ्याचा कालावधी हा प्रामुख्याने बहुतेक सागरी माशांच्या प्रजननाचा आणि पुनरुत्पादनाचा काळ असतो. या कालावधीत मत्स्यसंपत्तीचे संवर्धन व्हावे, समुद्रातील माशांची संख्या वाढण्यास मदत व्हावी आणि भविष्यात सागरी संसाधनांचे संरक्षण सुनिश्चित व्हावे, या उद्देशाने दरवर्षी या काळात मासेमारीवर बंदी घालण्यात येते. शासनाकडून यावर्षी मासेमारी बंदीचा कालावधी ६१ दिवसांचा निश्चित करण्यात आला होता.
६० दिवसांच्या या बंदीनंतर राज्य शासनाने यांत्रिक व अन्य नौकांना १२ सागरी मैलांपुढील खोल समुद्रात जाऊन मासेमारी करण्याची मुभा दिली आहे. मात्र, अरबी समुद्रात निर्माण झालेले वादळी वातावरण आणि मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे मच्छिमार नौका किनाऱ्यावरच थांबवून ठेवाव्या लागत आहेत. हवामान विभागाने दिलेला इशारा विचारात घेता, समुद्रातील उधाण आणि पावसाचा जोर ओसरल्यानंतरच व्यावसायिक मासेमारीला गती मिळण्याची चिन्हं आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:01 01-08-2026














