आपले सरकार सेवा केंद्र रत्नागिरी: २९० नवीन केंद्रांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; १४ ऑगस्ट अंतिम मुदत

आपले सरकार सेवा केंद्र रत्नागिरी अंतर्गत ग्रामीण व शहरी भागात सेवांचा विस्तार; जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे आवाहन

रत्नागिरी: आपले सरकार सेवा केंद्र रत्नागिरी जिल्ह्यात स्थापन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून अर्ज मागवण्याची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना विविध शासकीय सेवा आणि योजनांचे लाभ सहज मिळवून देण्यासाठी जिल्ह्यात २९० नवीन गावनिहाय ‘आपले सरकार सेवा केंद्र’ (CSC) उभारले जाणार आहेत. इच्छुक नागरिकांनी १४ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत आपले अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले आहे.

राज्यात होत असलेल्या जलद डिजिटलायझेशनचा एक भाग म्हणून सामान्य प्रशासन विभागाच्या २७ मार्च २०२५ च्या शासन निर्णयानुसार ही प्रक्रिया राबवली जात आहे. राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना शासकीय दाखले व सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या दुप्पट करण्याचे निर्देश शासनाकडून प्राप्त झाले आहेत. याच धोरणाचा भाग म्हणून रत्नागिरी जिल्ह्यासाठी ही नवीन केंद्र मंजूर करण्यात आली आहेत.

या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना विहित नमुन्यातील अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे. यामध्ये स्थानिक रहिवासी दाखला, ओळखपत्रे, शैक्षणिक कागदपत्रे (इयत्ता १२ वी पास, पदवी किंवा पदविका प्रमाणपत्र), एमएस-सीआयटी (MS-CIT) किंवा सीसीसी (CCC) संगणक प्रमाणपत्र, बँक पासबुकची प्रत आणि पोलीस क्लिअरन्स (PCC) प्रमाणपत्र किंवा त्याची पावती यांचा समावेश आहे. याशिवाय सुचवलेल्या केंद्राच्या कार्यालयाचे छायाचित्र, दिव्यांग, माजी सैनिक किंवा महिला स्वयंसहायता गट सदस्यत्वाचे प्रमाणपत्र असल्यास ते देखील सोबत जोडावे लागणार आहे.

इच्छुक व्यक्तींनी परिपूर्ण भरलेले अर्ज माहिती तंत्रज्ञान विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी येथे १४ ऑगस्ट २०२६ पर्यंत शासकीय सुट्ट्यांचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत स्वतः उपस्थित राहून (समक्ष) सादर करायचे आहेत. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. अधिक माहितीसाठी नागरिकांनी ८३५५८६८०६७ किंवा ९०१८२०२८४१ या भ्रमणध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा. प्राप्त अर्जांनुसार पात्र व अपात्र उमेदवारांची अंतिम यादी जिल्ह्याच्या www.ratnagiri.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:32 01-08-2026