Chiplun: गोवळकोट रोडवर भरदिवसा चोरी; सोन्याचे दागिने व रोख रकमेसह ८ लाखांहून अधिकचा ऐवज लंपास

अल नजु अपार्टमेंटमध्ये दरवाजाचा कडी-कोयंडा उचकटून मारला डल्ला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

चिपळूण: चिपळूण घरफोडीच्या एका मोठ्या घटनेने शहर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. शहरातील गोवळकोट रोड परिसरातील अल नजु अपार्टमेंटमध्ये ३० जुलै रोजी दुपारी भरदिवसा अज्ञात चोरट्याने घरफोडी करत सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा तब्बल ८ लाख १८ हजार रुपयांचा मौल्यवान ऐवज लंपास केला. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध तात्काळ घरफोडी व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी नगमा अबीदअली मुजावर (वय ४०, रा. गोवळकोट रोड, चिपळूण) या ३० जुलै रोजी दुपारी १२.३० ते १.४० वाजण्याच्या दरम्यान कामानिमित्त घराबाहेर गेल्या होत्या. हीच संधी साधून अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा तीक्ष्ण हत्याराच्या साहाय्याने उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील कपाटाची तोडफोड करून आत ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड घेऊन चोरटा पसार झाला.

चोरीस गेलेल्या ऐवजामध्ये सुमारे अडीच तोळे वजनाचे तीन सरींचे सोन्याचे मंगळसूत्र, एक तोळे वजनाचे सोन्याचे दुसरे मंगळसूत्र, एकूण तीन तोळे वजनाच्या पाच सोन्याच्या चेन, एक तोळे वजनाचा सोन्याचा नेकलेस, दोन तोळे वजनाच्या चार जोड सोन्याच्या कर्णफुल्या आणि सुमारे चार तोळे वजनाच्या १० सोन्याच्या अंगठ्या यांचा समावेश आहे. या दागिन्यांसोबतच कपाटात ठेवलेली ८ हजार रुपयांची रोख रक्कमही लंपास झाली असून, चोरीस गेलेल्या या सर्व ऐवजाची एकूण किंमत ८ लाख १८ हजार रुपये आहे.

दरम्यान, याच कालावधीत चिपळूणमधील बायपास रोड परिसरातील ‘द्वारका कृष्णकुंज’ बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या धनश्री भोसले यांच्या घरीही चोरी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या दोन्ही घरफोड्या एकाच आंतरजिल्हा किंवा स्थानिक टोळीने केल्या आहेत का, याचाही सखोल तपास पोलिसांकडून केला जात आहे. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २२१/२०२६ अन्वये भारतीय न्यायसंहिता (BNS) २०२३ मधील कलम ३०५(अ) व ३३१(३) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस पथके अज्ञात चोरट्याचा शोध घेत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:32 01-08-2026