Ratnagiri: रत्नदुर्ग सनसेट पॉईंटवरील लोखंडी रेलिंग कोसळले; निकृष्ट दर्जामुळे दोन वर्षांतच रेलिंग गंजले, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

रत्नदुर्ग किल्ला विकासकामांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; तातडीने दुरुस्ती करण्याची स्थानिक नागरिकांची मागणी

रत्नागिरी: रत्नदुर्ग सनसेट पॉईंटवरील लोखंडी रेलिंग गंजून पूर्णपणे कोसळल्याने ऐतिहासिक रत्नदुर्ग किल्ल्यावरील पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. विकासकामांच्या गुणवत्तेबाबत पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, केवळ दोन वर्षांतच हे लोखंडी संरक्षक रेलिंग मोडून पडल्याने निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.

ऐतिहासिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या रत्नदुर्ग किल्ल्यावर दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात. किल्ल्यावरील ‘शिवसृष्टी’नजीक असलेल्या सनसेट पॉईंटवर समुद्राचे विहंगम दृश्य आणि सूर्यास्त पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी असते. येथे होणारे अपघात टाळण्यासाठी संबंधित यंत्रणेकडून लोखंडी संरक्षक रेलिंग उभारण्यात आले होते. मात्र, खारे आणि दमट हवामान असलेल्या सागरी वातावरणाचा विचार न करता अत्यंत निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्यामुळे अवघ्या दोन वर्षांत संपूर्ण रेलिंग गंजून तुटून पडले आहे. सद्यस्थितीत हे रेलिंग मोडून पडल्यामुळे ते अक्षरशः भंगातात काढण्याच्या अवस्थेत पोहोचले आहे.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, समुद्रकिनाऱ्यावरील खारट वाऱ्यामुळे लोखंडाला गंज लागणे साहजिक असले तरी दोन वर्षांत संपूर्ण रेलिंग मोडून पडणे हे कामाच्या दर्जावर प्रश्न निर्माण करणारे आहे. या रेलिंगची नियमित देखभाल, रंगकाम आणि गंजप्रतिबंधक उपाययोजना करण्यात आल्या नसल्याने त्याची दुरवस्था झाली आहे. याशिवाय किल्ल्यावर अपूर्ण भूमिगत वीजवाहिनीचे काम पूर्ण करणे आणि जीर्ण तसेच धोकादायक वीजखांब/डीपी त्वरित बदलणे आवश्यक असल्याचे नागरिकांनी सांगितले.

लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या सुविधा अल्पलावधीतच निकामी होत असल्याने कामाचा दर्जा, देखभाल आणि कंत्राटदारांच्या जबाबदारीची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. प्रशासनाने या गंभीर बाबीची तातडीने दखल घेऊन प्रत्यक्ष पाहणी करावी व संरक्षक रेलिंगची तातडीने पुनर्रचना करावी, अन्यथा भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित यंत्रणांवर राहील, असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:33 01-08-2026