भटक्या कुत्र्यांचे होणार निर्बीजीकरण; नगर परिषदेच्या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत
राजापूर: राजापुरातील मोकाट गुरांबाबत नगर परिषद प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली असून शहरातील विविध भागांत फिरणारी १५ मोकाट गुरे पकडून त्यांची कोंडवाड्यात रवानगी केली आहे. वारंवार आवाहन करूनही संबंधित गुरे मालकांनी प्रतिसाद न दिल्याने आता या गुरांची वैद्यकीय तपासणी करून पुढील २ दिवसांत कायदेशीर प्रक्रियेद्वारे चिपळूण येथील गोशाळेत रवानगी केली जाणार असल्याचे नगर परिषद प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
राजापूर शहरात गेल्या काही दिवसांपासून मोकाट गुरे आणि भटक्या कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर वाढला होता. भर रस्त्यात, सार्वजनिक ठिकाणी आणि मुख्य बाजारपेठेत गुरांचा वावर व भटक्या कुत्र्यांच्या टोळक्यांमुळे नागरिक, व्यापारी आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या संदर्भात नागरिकांकडून सातत्याने तक्रारी प्राप्त होत होत्या. नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेतही या समस्येवर गंभीर चर्चा झाली होती. सभेत ठरल्यानुसार, जर मोकाट गुरे पकडून कोंडवाड्यात ठेवल्यानंतरही मालकांनी ती सोडवून न नेल्यास त्यांची रवानगी थेट गोशाळेत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
याच निर्णयाची कडक अंमलबजावणी करत राजापूर नगर परिषदेने महिनाभरापूर्वी ५ आणि गेल्या आठवड्यात १० अशी एकूण १५ मोकाट गुरे पकडली. प्रशासनाने गुरे मालकांना संपर्क साधून दंडात्मक कारवाई करून ती सोडवून नेण्याचे आवाहन केले होते. मात्र, गुरुवार अखेरपर्यंत एकाही मालकाने यावर दखल घेतली नाही. त्यामुळे राजापूर पशुधन अधिकाऱ्यांकडून या गुरांची वैद्यकीय तपासणी केली जाणार असून सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून त्यांना चिपळूणच्या गोशाळेत पाठवले जाईल.
यासोबतच, शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांच्या निर्बीजीकरणासाठी (Sterilization) निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात केली जाणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. नगर परिषदेने मोकाट गुरे आणि भटक्या कुत्र्यांविरोधात हाती घेतलेल्या या धडक मोहिमेचे शहरातील नागरिक, व्यापारी आणि वाहनधारकांकडून उत्स्फूर्त स्वागत केले जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:33 01-08-2026














