महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेतून मोफत उपचार; कोल्हापूर, मुंबईचा प्रवास अन् आर्थिक भुर्दंड वाचला
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, रत्नागिरी येथील डायलिसिस विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यातील किडनी विकारग्रस्त रुग्णांना मोठा दिलासा मिळत आहे. पूर्वी ज्या रुग्णांना डायलिसिससाठी कोल्हापूर, मुंबई किंवा खासगी रुग्णालयांमध्ये जाऊन हजारो रुपये खर्च करावे लागत होते, त्यांना आता रत्नागिरीतच मोफत व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध झाली आहे. महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत जिल्ह्यातील हजारो रुग्ण या योजनेचा यशस्वीपणे लाभ घेत आहेत.
तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली दर्जेदार उपचार
रत्नागिरीतील या विभागातील सर्व उपचार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद सांगवीकर आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विकास कुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत आहेत. तसेच डॉ. उत्तमराव कांबळे (वैद्यकीय अधिकारी), नेफ्रॉलॉजिस्ट (मूत्रपिंड तज्ज्ञ) डॉ. अमेय बेडेकर, प्रशिक्षित तंत्रज्ञ आणि परिचारिका यांच्या थेट देखरेखीखाली रुग्णांवर मोफत उपचार केले जातात.
मोफत औषधोपचार आणि रक्ताच्या तपासण्यांची सोय
डायलिसिस सत्रासोबतच रुग्णांना आवश्यक असणाऱ्या सर्व प्रकारच्या रक्ताच्या तपासण्या आणि लागणारी अत्यंत महत्त्वाची इंजेक्शन्स संपूर्णपणे मोफत दिली जातात. यामुळे रुग्णांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा मोठा आर्थिक भार कमी झाला आहे.
१६ बेड्स आणि अद्ययावत मशिन्सद्वारे २४ तास सेवा
सन २०१३ मध्ये सुरू झालेल्या या डायलिसिस विभागात सध्या १६ बेड्स आणि मशिन्स कार्यरत आहेत. त्यापैकी २ बेड्स व मशिन्स पॉझिटिव्ह रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले असून त्यांच्यासाठी स्वतंत्र आयसोलेशन रूम तयार करण्यात आला आहे. दरमहा ७० ते ८० नियमित रुग्ण या सुविधेचा लाभ घेत असून महिन्याला ६५० ते ७०० डायलिसिस सायकल पूर्ण होतात. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आगामी काळात बेड आणि मशिन्सची संख्या वाढवण्यात येईल, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी दिली.
वर्षाभरात १०२४ रुग्णांवर ९ हजारांहून अधिक डायलिसिस सायकल्स
जून २०२५ ते जून २०२६ या एका वर्षाच्या कालावधीत जिल्हाभरातील तब्बल १,०२४ नियमित रुग्णांनी या विभागाचा लाभ घेतला असून वर्षाभरात ९,०७६ डायलिसिस सायकल्स यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. रत्नागिरीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामुळे जिल्हा रुग्णालयाचा पूर्णपणे कायापालट झाला असून, ओपीडी आणि आयपीडी सेवांचा दरमहा हजारो रुग्ण लाभ घेत आहेत. ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी हा विभाग खऱ्या अर्थाने हक्काची ‘संजीवनी’ ठरत आहे.














