Ratnagiri rain: जिल्ह्यात जुलैअखेर सरासरी १९०० मि.मी. पाऊस; उशिरा सुरू होऊनही गतवर्षाच्या बरोबरीत नोंद, आतापर्यंत ५७ टक्के पडला पाऊस

जुलै महिन्यातील दमदार पुनरागमनाने भातपिकांना जीवनदान; नद्या आणि धरणांतील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ


रत्नागिरी / विशेष प्रतिनिधी:

रत्नागिरी जिल्ह्यात १ जून ते २ ऑगस्टअखेर एकूण १७ हजार ६३ मि.मी., तर सरासरी १ हजार ९०० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मान्सूनचे आगमन उशिरा होऊनही जुलै महिन्यात झालेल्या धुवाधार पावसामुळे यंदाच्या पावसाने गतवर्षाच्या पावसाची बरोबरी साधली आहे. जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत तब्बल ५७ टक्के पाऊस पडला आहे. मात्र, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

जूनमधील बॅकलॉग जुलैच्या पावसाने भरून काढला
जून महिन्यात जिल्ह्यात म्हणावा तसा पाऊस झाला नव्हता; केवळ चार ते पाच दिवस दमदार हजेरी लावल्यानंतर पावसाने मोठी दांडी मारली होती. यामुळे दुबार पेरणीचे संकट ओढावले होते, भातपिके पिवळी पडू लागली होती आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. मात्र, जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने जोरदार पुनरागमन करत जून महिन्यातील पावसाची तूट पूर्णपणे भरून काढली. जुलैतील दमदार हजेरीमुळे दुबार पेरणीचे संकट टळले असून पाणीटंचाईही दूर झाली आहे. गतवर्षी या कालावधीत सरासरी २ हजार मि.मी. पाऊस झाला होता, तर यंदा १ हजार ९०० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

४० हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावर भातलावणी पूर्ण
सततच्या आणि पूरक पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात ४० हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावर भातलावणीची कामे पूर्ण झाली आहेत. एकंदरीत जुलै महिना कोकणातील बळीराजासाठी वरदान ठरला आहे. या पावसाने सुकत आलेल्या भातपिकांना नवसंजीवनी दिली असून जिल्ह्यातील नद्या, नाले आणि धरणांतील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे.

तालुकानिहाय पावसाची आकडेवारी (मि.मी. मध्ये)
मंडणगड: २२२३.५०

दापोली: २१२०.१८

खेड: २३६१.१९

गुहागर: १६५५.२

चिपळूण: २२४७.११

संगमेश्वर: १५९६.८९

रत्नागिरी: १४८७.२५

लांजा: १६७७.४०

राजापूर: १७०५.२८

एकूण: १७०६३.८२

सरासरी: १९००

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:01 03-08-2026