Land Titling Act Maharashtra: राज्यात नवीन ‘लँड टायटलिंग कायदा’ आणणार; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची रत्नागिरीत घोषणा

‘आधी मोजणी, मग नोंदणी अन् फेरफार’; चिपळूणमध्ये नवीन तहसील कार्यालयाच्या मागणीला मंजुरी

रत्नागिरी / विशेष प्रतिनिधी:

जमिनींच्या व्यवहारांमध्ये पूर्ण पारदर्शकता आणण्यासाठी आणि सर्वसामान्यांची होणारी फसवणूक व त्रास थांबवण्यासाठी राज्य सरकार येत्या डिसेंबरच्या अधिवेशनात ‘आधी मोजणी, त्यानंतर नोंदणी आणि त्यानंतर फेरफार’ असा महत्त्वपूर्ण नवीन ‘लँड टायटलिंग कायदा’ आणणार आहे. यासोबतच कूळ, वहिवाटदार आणि देवस्थानांचे हक्क प्रस्थापित करण्यासाठी ‘देवस्थान जमीन इनाम कायदा’ देखील लवकरच आणला जाईल, अशी मोठी घोषणा राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे केली.

येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिरा’त ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

अडीच लाख नागरिकांना दाखल्यांचे वाटप; चिपळूण येथे नवीन तहसील कार्यालय

आपल्या भाषणात पुढे बोलताना महसूलमंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, रत्नागिरी जिल्ह्यात महसूल अभियानांतर्गत आतापर्यंत तब्बल अडीच लाख लोकांना विविध प्रकारचे आवश्यक दाखले थेट मिळवून देण्यात आले आहेत.

या कार्यक्रमादरम्यान आमदार प्रसाद लाड यांनी चिपळूण परिसरात नागरिकांच्या सोयीसाठी नव्याने एखादे तहसील कार्यालय निर्माण करण्यात यावे, अशी आग्रही मागणी व्यासपीठावरून केली. महसूलमंत्र्यांनी या मागणीसह स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सर्व प्रमुख मागण्यांना व्यासपीठावरूनच तत्त्वतः मंजुरी दिली.

विविध शासकीय योजनांच्या लाभांचे वितरण

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी महाराजस्व अभियानाची सविस्तर पार्श्वभूमी आणि जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली. यानंतर विविध शासकीय विभागांच्या पात्र लाभार्थ्यांना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्त लाभांचे वाटप करण्यात आले.

या भव्य सोहळ्याला उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत, जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे, आमदार किरण सामंत, आमदार प्रसाद लाड, आमदार प्रमोद जठार, आमदार विक्रांत पाटील, आमदार शेखर निकम, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, प्रशांत यादव, सतीश मोरे यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:08 03-08-2026