मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला असताना घडली दुर्घटना
रत्नागिरी / विशेष प्रतिनिधी:
शहरानजीकच्या कारवांचीवाडी येथील धनावडेवाडी बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या एका १६ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या दुर्दैवी घटनेमुळे गयाळवाडी परिसरात अत्यंत शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
सार्थक सुहास गुरव (वय १६, मूळ रा. लांजा, सध्या रा. गयाळवाडी, रत्नागिरी) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या दुर्दैवी मुलाचे नाव आहे.
पाण्याचा अंदाज न आल्याने घडला अपघात
मिळालेल्या माहितीनुसार, सार्थक हा रविवारी सकाळी गयाळवाडी परिसरातील आपल्या मित्रांसोबत कारवांचीवाडी येथील धनावडेवाडी बंधाऱ्यावर पोहण्यासाठी गेला होता. सर्व मित्र एकत्र पाण्यात पोहत असताना सार्थकला पाण्याचा आणि खोलीचा योग्य अंदाज आला नाही. त्यामुळे तो पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला आणि बुडू लागला.
नागरिकांची तातडीने धाव; उपचारांपूर्वीच प्राण ज्योत मालवली
सार्थक पाण्यात बुडत असल्याचे लक्षात येताच त्याच्या सोबत असलेल्या मित्रांनी घाबरून मोठ्याने आरडाओरडा केला. त्यांचा आवाज ऐकून आजूबाजूच्या नागरिकांनी तातडीने बंधाऱ्याच्या दिशेने धाव घेतली. स्थानिकांनी प्रसंगावधान राखून सार्थकला तातडीने पाण्यातून बाहेर काढले आणि उपचारासाठी रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.
मात्र, रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून सार्थकला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. या घटनेची नोंद स्थानिक पोलिसांत करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:18 03-08-2026














