Sankashti Chaturthi Ganpatipule: संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे मंदिरात भाविकांची अलोट गर्दी, भक्तिमय वातावरण

विविध रंगांच्या ताज्या फुलांनी सजले स्वयंभू श्री गणपती मंदिर; राज्यभरातून भाविक गणपतीपुळ्यात दाखल


गणपतीपुळे :

संकष्टी चतुर्थीच्या पावन पर्वानिमित्त प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथील स्वयंभू श्री गणपती मंदिरात रविवारी श्रींच्या चरणी मनमोहक फुलांची आरास करण्यात आली. विविध रंगांच्या ताज्या फुलांनी साकारलेल्या या देखण्या सजावटीमुळे मंदिर परिसर भक्तीमय वातावरणाने न्हाऊन निघाला होता. संकष्टी चतुर्थीनिमित्त रविवारी पहाटेपासूनच श्री गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. श्रींच्या समोर करण्यात आलेली ही आकर्षक फुलांची आरास श्रींच्या दर्शनाला आलेल्या भाविकांचे विशेष आकर्षण ठरली.

मंदिर परिसर भक्तीमय; ‘श्री गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला
फुलांच्या अत्यंत आकर्षक व सुबक सजावटीमुळे मंदिराचे नैसर्गिक सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते. अनेक भाविकांनी श्रींचे दर्शन घेत फुलांच्या आराशीचे मनमोहक दृश्य डोळ्यांत साठवले. संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने दिवसभर मंदिर परिसरात धार्मिक वातावरण पाहायला मिळाले, तर श्री गणरायाच्या जयघोषाने संपूर्ण गणपतीपुळे परिसर दुमदुमून गेला होता.

राज्यभरातून आलेले भाविक नतमस्तक
रत्नागिरी जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागांतून आलेल्या हजारो भाविकांनी श्रींच्या चरणी नतमस्तक होत दर्शन घेतले. यावेळी भाविकांनी सुख, समृद्धी आणि सर्व संकटांपासून मुक्ती मिळण्यासाठी श्रींच्या चरणी प्रार्थना केली. या आकर्षक फुलांच्या आरासेमुळे यंदाची संकष्टी चतुर्थी गणपतीपुळे येथे अत्यंत उत्साहात, भक्तिभावाने आणि मांगल्यपूर्ण वातावरणात साजरी झाली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:23 03-08-2026