नगरपरिषदेच्या इशाऱ्यानंतर जागा मालकाकडून भिंतीचे पुनर्बांधकाम सुरू
रत्नागिरी :
रत्नागिरी शहरातील मधला फगरवठार येथे मुसळधार पावसामुळे कोसळलेली संरक्षण भिंत पुन्हा उभारण्याचे काम सध्या अत्यंत वेगाने सुरू आहे. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसात रस्तालगतची ही भली मोठी भिंत ढासळली होती. भिंतीच्या पायाजवळ अनधिकृतपणे जागेचे सपाटीकरण व खुदाई केल्यामुळे पाया कमकुवत होऊन जमीन खचली होती आणि भिंत कोसळली होती. या प्रकारानंतर रत्नागिरी नगरपरिषदेने कडक भूमिका घेत संबंधित जागा मालकाकडूनच ही भिंत नव्याने बांधून घेण्याचे काम सुरू केले आहे.
जागा मालकाने स्वतःहून दर्शवली भिंत बांधून देण्याची तयारी
रत्नागिरी नगरपरिषदेने लाखो रुपये खर्च करून ही संरक्षण भिंत पूर्वी बांधली होती. त्यामुळे मुसळधार पावसात भिंत कोसळल्यानंतर नगरपरिषदेने निष्काळजीपणा करणाऱ्या जागा मालकावर थेट पोलीस कारवाई करण्याची भूमिका घेतली होती. प्रशासनाच्या या आक्रमक पवित्र्यानंतर जागा मालकाने नगरपरिषदेला पत्र देऊन ही संरक्षण भिंत स्वतःच्या खर्चाने बांधून देण्याची तयारी दर्शवली. जागा मालकाच्या या पत्राला नगरपरिषदेने सकारात्मक प्रतिसाद दिला आणि पुनर्बांधणीच्या कामाला परवानगी दिली.
५० टक्के काम पूर्ण; दळणवळणाचा धोका टळणार
सध्या फगरवठार येथील या सरंक्षक भिंतीचे काम वेगाने प्रगतीपथावर असून, आतापर्यंत सुमारे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. भिंतीचा पाया मजबूत करून नव्या स्वरूपात बांधकाम केले जात आहे. उर्वरित कामही लवकरात लवकर पूर्ण केले जाणार असून, यामुळे फगरवठार परिसरातील रस्त्याला असलेला धोका टळणार असल्याने वाहनधारक व स्थानिक रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:45 03-08-2026














