Chiplun: पोफळी-शिरगाव मार्गावरील रस्त्यांची दुरवस्था: राष्ट्रीय महामार्ग विभागाला राष्ट्रवादी महिला आघाडीचे निवेदन; ८ दिवसांत खड्डे बुजवण्याचा इशारा

चिपळूण शहर अन् तालुक्यातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य; दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा


चिपळूण शहर:

चिपळूण शहर व तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गासह पोफळी-शिरगाव मार्गावरील रस्त्यांची कमालीची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनधारक आणि स्थानिक नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर, रस्त्यांवरील खड्डे युद्धपातळीवर दुरुस्त करून पुढील आठ दिवसांच्या आत बुजवावेत, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार महिला आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा थेट इशारा महिला तालुकाध्यक्षा आरुता आडविलकर यांनी दिला आहे.

खड्ड्यांमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात; नागरिकांतून तीव्र असंतोष
या संदर्भात राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना महिला आघाडीच्या वतीने अधिकृत निवेदन सादर करण्यात आले आहे. या निवेदनात नमूद केल्यानुसार, पोफळी-शिरगाव मार्गासह चिपळूण शहर आणि तालुक्यातील अनेक प्रमुख रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे विद्यार्थिनी, नोकरदार महिला, गृहिणी, शेतकरी, शेतमजूर, व्यावसायिक महिला तसेच गरोदर महिलांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने खोलीचा अंदाज येत नाही, ज्यामुळे अपघातांचा धोका अधिक वाढला आहे. वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभागाकडून कोणतीही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नाही, अशी खंतही व्यक्त करण्यात आली.

८ दिवसांची मुदत; लोकशाही मार्गाने आंदोलनाचा इशारा
पोफळी-शिरगाव मार्गासह चिपळूण शहर व तालुक्यातील सर्व प्रमुख रस्त्यांची तातडीने पाहणी करून धोकादायक खड्डे तात्काळ बुजवावेत तसेच खराब झालेल्या रस्त्यांची दर्जेदार आणि कायमस्वरूपी दुरुस्ती करण्यात यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. अन्यथा ८ दिवसांनंतर महिला आघाडीच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दीपिका कोतवडेकर, आरुता आडविलकर, रुक्सार अल्वी, दीपिका कोलतेकर आणि सोनिया लोहिया यांनी दिला आहे.

निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चिपळूण तालुका अध्यक्ष राजेश केळसकर, युवक शहराध्यक्ष मुन्ना जसनाईक, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष रईस अल्वी, सत्येंद्रसिंग लोहिया आणि पुष्कराज पवार यांनी उपस्थित राहून महिला आघाडीच्या या भूमिकेला व आंदोलनाला पूर्ण पाठिंबा दर्शवला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:37 03-08-2026