रत्नागिरीत पोमेडी बुद्रुक ते निवसर रेल्वे ट्रॅकवर अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला; पोलिसांत नोंद

अंदाजे ३१ ते ३५ वयाचा मृतदेह छिन्न-विछिन्न अवस्थेत; रत्नागिरी ग्रामीण पोलिसांकडून ओळख पटवण्याचे आवाहन

रत्नागिरी तालुक्यातील पोमेडी बुद्रुक ते निवसर दरम्यान रेल्वे ट्रॅकवर एका ३१ ते ३५ वर्षे वयाच्या अज्ञात पुरुषाचा छिन्न-विछिन्न अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात बेवारस आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

रेल्वे स्टेशन मास्तरच्या माहितीनंतर पोलीस घटनास्थळी दाखल

रत्नागिरी रेल्वे स्टेशन येथे कर्तव्यावर असलेले राजेंद्र सिंह मुनेश्वर चौहान यांना २ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६:५० वाजेच्या सुमारास निवसरच्या रेल्वे स्टेशन मास्तरांनी फोनवरून माहिती दिली. पोमेडी बुद्रुक ते निवसर दरम्यान किलोमीटर २०८/४-५ च्या जवळ एक इसम मृत अवस्थेत पडल्याची बातमी मिळताच, पोलीस पथक आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

छिन्न-विछिन्न अवस्थेत आढळला मृतदेह

घटनास्थळाची पाहणी केली असता, सुमारे ३१ ते ३५ वर्षे वयाच्या एका अनोळखी पुरुषाचे प्रेत अत्यंत छिन्न-विछिन्न अवस्थेत आढळून आले. चालत्या ट्रेनची धडक बसल्याने अथवा ट्रेनमधून खाली पडल्याने हा अपघात घडला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

या घटनेबाबत राजेंद्र सिंह चौहान यांनी दिलेल्या माहितीवरून रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये आमृ. क्रमांक ७२/२०२६ नुसार आकस्मिक मृत्यूची (बेवारस) नोंद करण्यात आली आहे. मयत पुरुषाची ओळख पटवण्याचे काम पोलीस प्रशासनाकडून वेगाने सुरू असून, कोणाला काही माहिती असल्यास रत्नागिरी ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.