आंबेत पुलाला पर्यायी नवीन पूल उभारण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा; खासदार सुनील तटकरे यांची माहिती

मुख्यमंत्र्यांची लवकरच घेणार भेट; नव्या पुलामुळे कोकणाच्या विकासाला मिळणार गती


मंडणगड :

रत्नागिरी आणि रायगड या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या मंडणगड तालुक्यातील महत्त्वाच्या म्हप्रळ-आंबेत पुलाला पर्यायी नवीन पूल उभारण्यासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. यासंदर्भात येत्या डिसेंबरपर्यंत सकारात्मक निर्णय होईल, असा विश्वास खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केला आहे. या विषयावर आपण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लवकरच भेट घेऊन सविस्तर चर्चा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

कोलाड येथे पत्रकारांशी बोलताना खासदार तटकरे म्हणाले की, आंबेत पूल हा रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील नागरिकांसाठी जीवन वाहिनी ठरला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांच्या दूरदृष्टीतून उभारण्यात आलेल्या या पुलामुळे मंडणगड, दापोली, श्रीवर्धन, म्हसळा, माणगावसह संपूर्ण कोकणातील हजारो नागरिकांचा प्रवास सुकर झाला आहे. व्यापार, शिक्षण, आरोग्य सेवा आणि पर्यटनाच्या दृष्टीने या पुलाचे अत्यंत मोठे महत्त्व आहे.

२०१७ मधील डागडुजी अन् जेटीचा यशस्वी प्रयोग
२०१७ मध्ये आंबेत पुलाच्या स्ट्रक्चरल ऑडिटनंतर दुरुस्तीच्या कामासाठी येथील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. त्या काळात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आपल्या पुढाकाराने राज्य शासनाने जेटी उभारून फेरीबोटीच्या माध्यमातून पर्यायी वाहतूक व्यवस्था सुरू केली होती. राज्यात अशा प्रकारची पर्यायी जलवाहतूक व्यवस्था प्रथमच राबवण्यात आली होती. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांच्या हिताचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला होता, असे तटकरे यांनी आवर्जून सांगितले.

Khabardar diwali fest

नवीन पुलामुळे पर्यटन, व्यापार अन् कृषी क्षेत्राला मोठा फायदा
आंबेत पुलाला पर्यायी नवीन पूल उभारण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने होत आहे. याबाबत संबंधित विभागाला आधीच आवश्यक सूचना देण्यात आल्या असून सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याशीही या विषयावर सकारात्मक चर्चा झाली आहे. नवीन पूल उभारण्यात आल्यास भविष्यातील वाढती वाहतूक क्षमता लक्षात घेऊन सुरक्षित व सक्षम दळणवळण व्यवस्था निर्माण होईल. यामुळे मंडणगड, दापोली, श्रीवर्धनसह कोकणातील पर्यटन, व्यापार, उद्योग आणि कृषी क्षेत्राला मोठा फायदा होणार असून या प्रकल्पाला शासनाने प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा खासदार तटकरे यांनी व्यक्त केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:53 03-08-2026