भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्राचा पाचवा वर्धापनदिन उत्साहात; नूतनीकृत योगभवनाचे लोकार्पण व तीन ग्रंथांचे प्रकाशन
Kalidas Sanskrit University Ratnagiri च्या उपकेंद्राच्या भविष्यातील विस्ताराबाबत कुलगुरूंनी महत्त्वाची भूमिका मांडली आहे. वर्धापनदिन हा केवळ उत्सव साजरा करण्याचा दिवस नसून संस्थेच्या कार्याचा आढावा घेऊन आगामी वाटचालीची दिशा निश्चित करण्याचा क्षण आहे, असे प्रतिपादन कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेकचे कुलगुरू डॉ. अतुल वैद्य यांनी केले. पुढील पाच वर्षांत कोणती उद्दिष्टे गाठायची याचा स्पष्ट आराखडा तयार केला पाहिजे असून, रत्नागिरीतील या संस्कृत अध्ययन केंद्राचे भविष्यात पूर्ण उपपरिसरात (Sub-Campus) रूपांतर व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र, रत्नागिरी उपकेंद्राच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त रविवारी अरिहंत मॉल (एसटी स्टॅंडसमोर) येथे आयोजित सोहळ्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. उद्योग, मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. या सोहळ्याला मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. केतन चौधरी, विश्वविद्यालयाचे कुलसचिव डॉ. रोशन अलोने, साहित्य विभागाच्या अधिष्ठाता प्रा. कविता होले, वेद व व्याकरण विभागाचे अधिष्ठाता प्रा. हरेकृष्ण अगस्ती, परीक्षा नियंत्रक डॉ. जयवंत चौधरी तसेच रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांची प्रमुख उपस्थिती होती.
नव्या पिढीचा विचार करून संस्कृत भाषा, भारतीय ज्ञानपरंपरा आणि शाश्वत विकास यांना जोडणारे कार्य अधिक व्यापक करण्यासाठी राज्य शासनाची मदत घेण्यात येईल, असे कुलगुरूंनी स्पष्ट केले. प्रमुख अतिथी डॉ. केतन चौधरी यांनी भारतीय संस्कृती ही पर्यावरण संवर्धनाची शिकवण देणारी असल्याचे सांगितले. सम्राट चंद्रगुप्ताच्या काळात ऋषींनी आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी या काळात माशांचे प्रजनन होत असल्याने मासेमारी टाळण्याची सूचना केली होती, हा भारतीय ज्ञानपरंपरेतील वैज्ञानिक दृष्टिकोन नव्या पिढीपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
वर्धापनदिनाच्या या औचित्यावर कुलगुरू डॉ. अतुल वैद्य यांच्या हस्ते नूतनीकृत योगभवनाचे औपचारिक लोकार्पण करण्यात आले, ज्यामुळे रत्नागिरीकरांना निःशुल्क नियमित योगवर्गांची सुविधा उपलब्ध होणार आहे. याशिवाय उपकेंद्राच्या ५ वर्षांच्या वाटचालीची माहितीपट (डॉक्युमेंटरी) प्रदर्शित करण्यात आली. तसेच ‘धर्मशास्त्रातील आंतरविद्याशाखीय संशोधन’, ‘कोकणातील विद्वानांचे संस्कृत साहित्यातील योगदान’ आणि ‘सनातन धर्म’ या तीन महत्त्वपूर्ण ग्रंथांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. शैक्षणिक सहकार्याचा भाग म्हणून या वेळी अध्ययन केंद्र आणि श्रीमान भागोजी शेठ कीर विधी महाविद्यालय यांच्यात सामंजस्य करारावर (MoU) स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
कार्यक्रमात गेल्या पाच वर्षांच्या प्रवासात मोलाचे योगदान देणाऱ्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा व संस्थांचा कृतज्ञतापूर्वक सत्कार करण्यात आला. यामध्ये डॉ. कल्पना आठल्ये, डॉ. आशिष बर्वे, डॉ. दिनेश रसाळ, डॉ. माधवी जोशी, डॉ. विवेक भिडे, ॲड. रुची महाजनी, श्रीकांत रांगणेकर, अनंत आगाशे, प्रभात भालेकर आणि संजय घोसाळे यांचा गौरव झाला. यासोबतच शासकीय अध्यापक महाविद्यालय, संस्कृत भारती, गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, नाणीज संस्थान, रिगल कॉलेज गुहागर, गणपतीपुळे देवस्थान यांसह अनेक शैक्षणिक व सामाजिक संस्थांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक डॉ. दिनकर मराठे यांनी केले, सूत्रसंचालन स्वरूप काणे यांनी तर आभार कुलसचिव डॉ. रोशन अलोने यांनी मानले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:15 04-08-2026














