Chiplun Wild Bison Threat: कुडप गाव परिसरात गव्यांची दहशत; भातशेतीचे मोठे नुकसान, वनविभागाने बंदोबस्त करण्याची मागणी

सावर्डे-कुडप मार्गावर मानवी वस्तीजवळ गव्यांचा वावर; वालावलकर रुग्णालय व शिक्षण संस्थांचा परिसर प्रभावित

Chiplun Wild Bison Threat संदर्भातील चिंतेची बाब चिपळूण तालुक्यातून समोर येत आहे. चिपळूण तालुक्यातील सावर्डे नजीक असलेल्या कुडप गाव परिसरात मुख्य मार्गालगत तसेच रहदारीच्या वस्तीच्या ठिकाणी गव्यांची (गवे रेड्यांची) मोठी वर्दळ वाढल्याने स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी, विद्यार्थी आणि महिला वर्गामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसेंदिवस गव्यांचे कळप थेट मानवी वस्तीजवळ येत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून गवे रेड्यांचे कळप भातशेतीसह इतर नगदी पिकांमध्ये घुसून पिकांचे अतोनात नुकसान करत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहेत. वर्षभर अहोरात्र कष्ट करून उभी केलेली शेती काही तासांत उद्ध्वस्त होत असल्याने स्थानिक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. गव्यांच्या पायाखाली तुडवले गेल्यामुळे अनेक ठिकाणी भात पिकांची धूळधाण झाली आहे.

विशेष म्हणजे, हे गवे रेडे मुख्य रस्त्यालगत आणि नागरी वस्तीच्या अगदी जवळ सर्रास वावरताना दिसत आहेत. हा परिसर बी. के. वालावलकर रुग्णालय देरुख/डेरवण, वैद्यकीय महाविद्यालय, इंग्लिश मीडियम स्कूल आणि नर्सिंग कॉलेजच्या अगदी जवळ असल्याने येथे वैद्यकीय कर्मचारी, रुग्ण, तसेच शाळा-कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची सतत वर्दळ असते. गव्यांच्या वाढत्या वावरामुळे विशेषतः सकाळी आणि सायंकाळी घराबाहेर पडताना नागरिकांना मोठी सावधगिरी बाळगावी लागत आहे.

एखादा मोठा अनर्थ घडण्यापूर्वी वन विभागाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे. या गवे रेड्यांचा मानवी वस्तीतील वावर नियंत्रित करण्यासाठी आवश्यक त्या तातडीने उपाययोजना कराव्यात, बाधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य व भरीव भरपाई द्यावी आणि परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी योग्य पावले उचलावीत, अशी ठाम मागणी कुडप येथील स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:23 04-08-2026