Kutgiri Tijag River Bridge Collapse: कुटगिरी येथे लोखंडी साकव कोसळून बैलाचा मृत्यू, नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तातडीने ३२ हजारांची मदत

लोखंडी साकव दुर्घटनेत अडकलेल्या ८ जनावरांना ग्रामस्थांनी काढले बाहेर; प्रशासनाकडून 18 तासांच्या आत मदत धनादेश सुपूर्द

Kutgiri Tijag River Bridge Collapse संदर्भात गुहागर तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. मौजे कुटगिरी येथील प्रसिद्ध भैरी शंकर मंदिरानजीक तिजग नदीवर असणारा लोखंडी साकव (साकव पूल) सोमवारी सायंकाळी अचानक कोसळला. या दुर्घटनेमुळे पुलावरून जाणारी आठ जनावरे थेट नदीपात्रात अडकली होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने मदतकार्य सुरू करून सर्व आठ जनावरांना सुरक्षितपणे बाहेर काढले.

या दुर्घटनेत दुर्दैवाने स्थानिक शेतकरी दिलीप नारायण लिंगायत यांच्या मालकीचा एक बैल जागीच मृत झाला, तर उर्वरित सात जनावरे किरकोळ जखमी झाली आहेत. घटनेची माहिती मिळताच पशुवैद्यकीय विभागाने घटनास्थळी धाव घेऊन जखमी जनावरांवर तातडीने वैद्यकीय उपचार केले तसेच मृत बैलाचे नियमानुसार शवविच्छेदन पूर्ण केले.

प्रशासनाकडून तातडीने शासकीय आर्थिक मदत

घटनेचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने अत्यंत वेगाने पावले उचलली. मृत बैलाच्या नुकसानीपोटी शेतकरी दिलीप लिंगायत यांना ३२ हजार रुपयांच्या शासकीय आर्थिक सहाय्याचा धनादेश आज (४ ऑगस्ट) सकाळी ११:३० वाजता सुपूर्द करण्यात आला.

हा मदत धनादेश उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) आकाश लिगाडे, गुहागरचे तहसीलदार परिक्षीत पाटील, पाटपन्हाळेचे मंडळ अधिकारी अनिल राठोड आणि स्थानिक ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत देण्यात आला. या प्रसंगी प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी पशुवैद्यकीय विभागाला दुर्घटनेत जखमी झालेल्या इतर सर्व जनावरांवर नियमित व आवश्यक ते सर्व उपचार सुरू ठेवण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:55 04-08-2026