अतिरिक्त कार्यभार १० किमी दूर मुरडव येथे; लहान-मोठ्या कामासाठी २० किमीचा प्रवास
आरवली:
संगमेश्वर तालुक्यातील कोंडिवरे गावातील पोलीस पाटील पद गेल्या १० वर्षांहून अधिक काळापासून रिक्त असल्याने गावातील विद्यार्थी, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या पदाचा अतिरिक्त कार्यभार तब्बल १० किलोमीटर अंतरावर असलेल्या मुरडव येथील पोलीस पाटलांकडे सोपवण्यात आला आहे. यामुळे प्रत्येक लहान-मोठ्या शासकीय कामासाठी ग्रामस्थांना ये-जा मिळून तब्बल २० किलोमीटरचा प्रवास करावा लागत असून प्रशासनाच्या या सततच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
शासकीय दाखले आणि पंचनाम्यांसाठी पायपीट; वेळेसह आर्थिक भुर्दंड
कोंडिवरे येथे हे पद रिक्त असल्याने प्रत्येक कामासाठी नागरिकांना मुरडव येथे जावे लागत आहे. शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, पिकांचे नुकसान किंवा अन्य कारणांसाठी पंचनामे करणे तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे मिळवताना मोठा विलंब होत आहे. याशिवाय गावातील तंटे, भांडणे किंवा इतर तक्रारींची नोंद करण्यासाठीही नागरिकांना वारंवार मुरडवला जावे लागत असल्याने वेळेचा अपव्यय होत असून आर्थिक खर्चही वाढतो आहे.
निवेदने देऊनही दुर्लक्ष; कायमस्वरूपी नियुक्ती न झाल्यास आंदोलनाचा इशारा
गेल्या दशकभरापासून रिक्त असलेले हे पद भरण्याकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामस्थांनी यापूर्वी तहसील कार्यालय, पोलीस प्रशासन तसेच संबंधित महसूल विभागाकडे अनेक वेळा निवेदने देऊन पोलीस पाटील पद तातडीने भरण्याची मागणी केली. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे कोंडिवरे गावासाठी कायमस्वरूपी पोलीस पाटलाची नियुक्ती तातडीने करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:47 04-08-2026














