Aravali Makhajan Road Potholes: आरवली-माखजन रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य; कोंडिवरे येथे भीषण परिस्थिती, अपघातांची भीती

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामावर प्रश्नचिन्ह; तातडीने दुरुस्ती न झाल्यास आंदोलनाचा इशारा

Aravali Makhajan Road Potholes संदर्भात संगमेश्वर तालुक्यातून एक गंभीर समस्या समोर येत आहे. आरवली ते माखजन या अत्यंत महत्त्वाच्या मार्गावर सध्या सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. विशेषतः कोंडिवरे गावाजवळील रस्त्याची दुरवस्था अत्यंत बिकट झाली असून, रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघातांची दाट शक्यता निर्माण झाली आहे. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने रात्रीच्या वेळी खड्ड्यांचा अंदाज येत नसून, प्रवासी व वाहनचालक जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत.

कोंडिवरे गावातील मुख्य रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे सध्या तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. रस्त्यावर पाण्याचे डबके साचल्याने रस्ता ओळखणेही कठीण झाले आहे. या मार्गावरून दररोज शाळकरी मुले, रुग्णवाहिका, एसटी बसेस आणि शेतमालाची मोठी वाहतूक होत असते. मात्र, ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत असून, दुचाकीस्वार अनेकदा घसरून पडत आहेत. बुरंबाड आणि माखजन हद्दीतही रस्त्याची अशीच बिकट अवस्था झाल्याने स्थानिक नागरिक व प्रवासी त्रस्त झाले आहेत.

बांधकाम विभागाच्या निकृष्ट कामावर संताप

काही दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम केले होते. मात्र, अत्यंत निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्यामुळे आणि दर्जाहीन कामामुळे हे खड्डे अवघ्या दोन दिवसांतच पुन्हा उखडले गेले आहेत. यामुळे बांधकाम विभागाच्या कामाचे पितळ उघडे पडले आहे.

“केवळ मलमपट्टी न करता रस्त्याची कायमस्वरूपी दर्जात्मक डागडुजी करण्यात यावी. आमच्या जिवाशी खेळू नका,” अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. प्रशासनाने तातडीने या रस्त्याची दुरुस्ती केली नाही, तर सर्वपक्षीय ग्रामस्थ एकत्र येऊन तीव्र आंदोलन छेडतील, असा स्पष्ट इशाराही येथील नागरिकांनी दिला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:08 04-08-2026