नायरा पेट्रोल पंपाजवळ रस्त्याची दयनीय अवस्था; तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी
Mirjoli Guhagar Chiplun Road Potholes संदर्भात चिपळूण तालुक्यातून प्रवाशांच्या सुरक्षेशी संबंधित एक गंभीर बाब समोर येत आहे. गुहागर-चिपळूण मार्गावरील मिरजोळी-साखरवाडी येथील नायरा पेट्रोल पंपाजवळील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. ठिकठिकाणी पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत असून, जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने त्यांच्या खोलीचा अंदाज येत नाही. त्यामुळे दुचाकीस्वार, चारचाकी वाहनचालक आणि पादचाऱ्यांसाठी हा मार्ग अत्यंत धोकादायक बनला आहे. रुग्णवाहिकांसह अत्यावश्यक सेवांच्या वाहनांनाही या खड्ड्यांमुळे अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. या मार्गावर लहान-मोठे अपघात वारंवार घडत असल्याने संबंधित प्रशासनाने तातडीने दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, अशी जोरदार मागणी सामाजिक कार्यकर्ते रहिमान दलवाई यांनी केली आहे.
निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाईची मागणी
या समस्येबाबत बोलताना सामाजिक कार्यकर्ते रहिमान दलवाई म्हणाले, “रस्त्यांची नियमित देखभाल आणि दुरुस्ती करणे ही शासनाची मूलभूत जबाबदारी आहे. केवळ तात्पुरती डागडुजी किंवा मलमपट्टी करण्याऐवजी दर्जेदार आणि टिकाऊ रस्ते उभारणे गरजेचे आहे. निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि अपघातप्रवण ठिकाणांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी.”
मिरजोळी-साखरवाडी परिसरातील या खड्ड्यांमुळे कोणतीही मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) तातडीने रस्त्याची डागडुजी करावी. नागरिकांच्या जिवाच्या सुरक्षेचा विचार करून प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही स्थानिक नागरिकांकडून देण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:15 04-08-2026














