जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे तपासणीचे निर्देश; अस्वच्छता व नियमभंग आढळल्यास परवाना होणार रद्द
FDA Ratnagiri Hotels Crackdown अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व खाद्य आस्थापनांवर अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचा बडगा उगारला जाणार आहे. राज्यात अन्न सुरक्षा नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी एफडीएने सुरू केलेल्या विशेष मोहिमेची झळ आता जिल्ह्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, बेकऱ्या, सरकारी कॅन्टीन आणि क्लबनाही बसणार आहे. जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाला जिल्ह्यातील सर्व खाद्य आस्थापनांची तातडीने सखोल तपासणी करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
राज्यभरात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली अस्वच्छता, निकृष्ट दर्जाचे अन्न आणि नियमभंग करणाऱ्या आस्थापनांविरोधात कठोर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. या धर्तीवर रत्नागिरी जिल्ह्यात अद्याप व्यापक कारवाई का झाली नाही, असा प्रश्न पत्रकार परिषदेत उपस्थित करण्यात आला होता. यावर उत्तर देताना जिल्हाधिकारी जिंदल यांनी, “लवकरच रत्नागिरी जिल्ह्यातही अन्न सुरक्षा नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी व्यापक तपासणी मोहीम राबवली जाईल आणि ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल,” असे स्पष्ट केले.
सरकारी कॅन्टीन आणि बेकऱ्यांचीही होणार तपासणी
विशेष म्हणजे ही मोहीम केवळ खासगी हॉटेल्स व रेस्टॉरंट्सपुरती मर्यादित राहणार नसून, विविध शासकीय कार्यालयांमधील कॅन्टीन, बेकऱ्या आणि क्लब यांचीदेखील कसून तपासणी केली जाणार आहे. तपासणी दरम्यान नियमांचे उल्लंघन आढळल्यास अथवा गंभीर त्रुटी समोर आल्यास संबंधित आस्थापनांचा परवाना थेट निलंबित किंवा कायमस्वरूपी रद्द करण्याची कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा प्रशासनाने दिला आहे.
‘या’ त्रुटी आढळल्यास होणार थेट कारवाई:
- स्वयंपाकघरातील अस्वच्छता: किचन किंवा साठवणुकीच्या जागेत अस्वच्छता आढळल्यास.
- कीटकांचा वावर: स्वयंपाकघरात उंदीर, झुरळे किंवा इतर उपद्रवी कीटकांचा वावर असणे.
- मुदतबाह्य अन्नपदार्थ: एक्सपायरी डेट उलटून गेलेले अन्नपदार्थ किंवा साहित्य वापरणे वा विकणे.
- खाद्यतेलाचा पुनर्वापर: एकदा वापरलेले तळणीचे तेल वारंवार वापरणे.
- निकृष्ट दर्जाचा कच्चा माल: निकृष्ट किंवा भेसळयुक्त खाद्यपदार्थ व कच्चा माल वापरणे.
- अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन: एफडीएच्या कायदेशीर नियमावलीचे पालन न करणे.
ग्राहकांच्या आरोग्याशी आणि स्वास्थ्याशी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असे स्पष्ट संकेत या मोहिमेच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:34 04-08-2026














