Bhagoji Sheth Keer Law College: भागोजी शेठ कीर विधी महाविद्यालयात ‘कथाकथन’ व ‘कथालेखन’ कार्यशाळा उत्साहात

रत्नागिरीतील विधी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी दोन दिवसीय कार्यशाळेचे यशस्वी आयोजन

रत्नागिरी: विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासह प्रभावी संवादकौशल्य, सर्जनशीलता आणि न्यायालयीन मांडणीची क्षमता विकसित करण्याच्या उद्देशाने येथील भागोजी शेठ कीर विधी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागातर्फे दोन दिवसीय ‘कथाकथन’ व ‘कथालेखन’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या दोन्ही कार्यशाळांना विद्यार्थ्यांचा अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

प्रसिद्ध लेखिका सौ. सुनीता तांबे यांचे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन

कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी प्रसिद्ध लेखिका व कथाकथनकार सौ. सुनीता तांबे यांनी विद्यार्थ्यांना कथा शास्त्रशुद्ध पद्धतीने कशी मांडावी, तिची रचना कशी असावी आणि प्रभावी कथाकथनासाठी आवश्यक असलेल्या सूत्रांचे सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष कथाकथन करून घेत त्यांच्या सादरीकरणातील गुण-दोष स्पष्ट केले आणि सुधारणांसाठी मोलाचे मार्गदर्शन केले.

दुसऱ्या दिवशी पार पडलेल्या कथालेखन कार्यशाळेत त्यांनी कथालेखनाची संकल्पना, कथांचे विविध प्रकार, प्रभावी कथा लिहिण्याची तंत्रे आणि लेखनातील आवश्यक घटकांचे विवेचन केले. या वेळी विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष कथालेखनाचा सराव करून घेत त्यांना लेखनासाठी उपयुक्त सूत्रे दिली. या दोन दिवसांत विद्यार्थी आणि प्राध्यापक वर्गाने अत्यंत उत्साहाने उपक्रमात सहभाग नोंदवला.

न्यायालयीन युक्तिवादासाठी कथाकथन व कथालेखन उपयुक्त: प्राचार्य डॉ. आशिष बर्वे

कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आशिष बर्वे यांनी कायद्याच्या विद्यार्थ्यांसाठी ही कौशल्ये अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. “न्यायालयीन युक्तिवाद, तथ्यांची प्रभावी मांडणी, केसचे सखोल विश्लेषण आणि संवादकौशल्य वृद्धिंगत करण्यासाठी कथाकथन व कथालेखन या कौशल्यांचा मोठा उपयोग होतो,” असे मत त्यांनी व्यक्त केले. या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना सर्जनशील लेखन, प्रभावी अभिव्यक्ती आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांनी भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

Radhakrushna patapedhi

प्राध्यापक वर्गाचा सक्रिय सहभाग

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापिका डॉ. संयोगिता सासने यांनी केले. उपस्थितांचे स्वागत आणि सत्कार प्राध्यापिका तृप्ती देवरुखकर यांनी केले, तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका गौरी शेवडे यांनी सांभाळले. कार्यक्रमाच्या शेवटी प्राध्यापिका धनश्री कदम यांनी उपस्थितांचे आभार मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:15 05-08-2026