Ratnagiri FDA Action: रत्नागिरीत अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; १५१ ठिकाणी छापेमारी, १२ लाखांचा गुटखा जप्त

३२ आस्थापनांना नोटिसा तर १५ जणांना ६० हजारांचा दंड

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या अन्न व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांवर अन्न आणि औषध प्रशासन (FDA) विभागाने धडक कारवाई सुरु केली आहे. सहाय्यक आयुक्त ललित गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने मार्च महिन्यापासून तब्बल १५१ ठिकाणी अचानक छापेमारी केली. या तपासणीदरम्यान अस्वच्छता बाळगणाऱ्या ३२ जणांना तातडीने सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, तर १५ आस्थापनांवर कारवाई करत एकूण ६० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यामध्ये शिवाजीनगर येथील एका प्रसिद्ध बिर्याणी सेंटरला अस्वच्छतेप्रकरणी १३ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

मिठाईच्या ट्रेवर ‘उत्पादन व मुदत संपण्याची तारीख’ अनिवार्य

रत्नागिरीतील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रशासनाने मिठाई विक्रेत्यांसाठी कडक नियमावली लागू केली आहे. जिल्ह्यातील सर्व स्वीट मार्ट चालकांना विक्रीसाठी ठेवलेल्या प्रत्येक मिठाईच्या डब्यावर किंवा ट्रेवर ‘उत्पादन तारीख’ आणि ‘एक्स्पायरी तारीख’ दर्शवणारे लेबल लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

१२ लाख रुपयांचा अवैध प्रतिबंधित गुटखा जप्त

अवैध गुटखा विक्रीवरही एफडीएने जोरदार प्रहार केला आहे. एप्रिल महिन्यापासून राबवलेल्या विशेष मोहिमेत अन्न प्रशासनाने स्वतंत्रपणे ६ मोठ्या कारवाया करत ६ लाख रुपयांचा गुटखा जप्त केला. याशिवाय पोलीस आणि अन्न प्रशासनाच्या संयुक्त कारवाईत आणखी ६ लाखांचा माल हस्तगत करण्यात आला. अशा प्रकारे एकूण १२ लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात प्रशासनाला यश आले आहे.

शालेय पोषण आहाराबाबत विशेष मार्गदर्शन व कडक निर्देश

विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी शाळांमध्ये पोषण आहार तयार करताना २०२० च्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांचा आहार सुरक्षित राहावा यासाठी शिक्षक व आहार चालकांसाठी विशेष मार्गदर्शन शिबिरे घेण्यात आली आहेत. शाळांमधील स्वयंपाकघर, अन्न शिजवण्याची जागा आणि धान्याची स्वच्छता यावर आता एफडीएची विशेष नजर असणार आहे.

अन्न सुरक्षा निरीक्षक तृप्ती घरत यांनी सर्व अन्न आस्थापनांना परिसरात चोख स्वच्छता राखण्याचे निर्देश दिले आहेत. शाळांच्या आसपासच्या परिसरात तेलकट व अस्वच्छ खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कडक नजर ठेवली जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:27 05-08-2026