चिपळूण तालुक्यातील केदारनाथ मंदिर परिसरातील घटना
सावर्डे: चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे मुसळधार पावसामुळे सोमवारी रात्री श्री केदारनाथ मंदिराजवळील मोठे झाड रस्त्यावर कोसळल्याची घटना घडली. झाड वीजवाहिन्यांवर पडल्याने परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला आणि परिसर अंधारात बुडाला. तसेच मुख्य मार्ग काही काळ वाहतुकीसाठी बंद राहिल्याने स्थानिक नागरिकांची मोठी गैरसोय झाली.
अनेक वाड्यांचा संपर्क तुटला; परिसर अंधारात
रात्री सुमारे ११ च्या सुमारास अचानक झाड कोसळल्याने श्री केदारनाथ मंदिर, उदेगवाडी, स्मशानभूमी, शंकर मंदिर आणि केदारनाथ कॉलनीकडे जाणारा रस्ता पूर्णपणे बंद झाला होता. मुख्य मार्गावर झाड पडल्यामुळे या भागातील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती.
महावितरण आणि ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे वाहतूक व वीज सुरळीत
घटनेची माहिती मिळताच महावितरणचे कर्मचारी तेजस कुंभार, प्रसाद गुरव, तन्मय बागवे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भर पावसात तातडीने घटनास्थळी धाव घेत दुरुस्तीचे काम सुरू केले. सुमारे एका तासाच्या अथक प्रयत्नांनंतर तात्पुरता वीजपुरवठा पूर्ववत करण्यात यश आले. यानंतर ग्रामस्थ आणि संबंधित यंत्रणांनी रस्त्यावर पडलेले झाड बाजूला हटवून वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, संपूर्ण वीजपुरवठा पूर्णपणे पूर्ववत करण्यासाठी महावितरणकडून दुरुस्तीचे काम वेगाने सुरू आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:40 05-08-2026














