वेळेत धान्य न मिळणे, अपुरा माल आणि अरेरावीला कंटाळले नागरिक; नगरसेवकांच्या पाठपुराव्याला यश
रत्नागिरी शहरातील कोकणनगर येथील शासकीय रास्त धान्य दुकाणातील कथित गैरकारभार आणि ग्राहकांच्या अडवणुकीविरोधात नागरिकांचा उद्रेक झाला. गेल्या अनेक दिवसांपासून वेळेत रेशन न मिळणे, अपुरा माल देणे आणि अरेरावीच्या वागणुकीला कंटाळलेल्या नागरिकांनी दुकानासमोर एकत्र येत तीव्र संताप व्यक्त केला.
नगरसेवकांच्या पाठपुराव्यामुळे पुरवठा विभाग घटनास्थळी दाखल
कोकणनगर येथील रेशन दुकानदार यांच्या मनमानी कारभाराबाबत स्थानिक नागरिकांनी प्रभाग क्र. ४ चे नगरसेवक केतन शेट्ये आणि नगरसेविका फौजिया तनवीर मुजावर यांच्याकडे अनेकदा तक्रारी केल्या होत्या. नागरिकांच्या तक्रारींची गंभीर दखल घेत दोन्ही लोकप्रतिनिधींनी पुरवठा विभागाकडे त्वरित कारवाईची मागणी लावून धरली. त्यानुसार पुरवठा निरीक्षण अधिकारी निशा पाइकराव आणि सायली चव्हाण यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल होऊन परिस्थितीची पाहणी केली.
नागरिकांचे गाऱ्हाणे आणि लेखी तक्रारींची नोंद
- अधिकाऱ्यांसमोर गाऱ्हाणे मांडताना नागरिकांनी सांगितले की, दुकानातून एकाच वेळी संपूर्ण रेशन दिले जात नाही.
- कधी फक्त गहू तर कधी तांदूळ दिले जात असल्याने एकाच महिन्याच्या धान्यासाठी नागरिकांना वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत.
- यामुळे सर्वसामान्यांचा वेळ आणि पैशांचा नाहक अपव्यय होत असल्याचे नागरिकांनी स्पष्ट केले.
- नियमित धान्य न मिळणे आणि विचारणा केल्यास उद्धटपणे बोलणे यामुळे नागरिक प्रचंड त्रस्त झाले होते.
- पुरवठा अधिकाऱ्यांनी उपस्थित नागरिकांच्या लेखी तक्रारी नोंदवून घेत दुकानाची प्राथमिक तपासणी केली.
गंभीर त्रुटी आढळल्याने रास्त धान्य दुकान तत्काळ सील
तपासणीदरम्यान दुकानात गंभीर त्रुटी आणि नियमभंग निष्पन्न झाल्याने अधिकाऱ्यांनी संबंधित रास्त धान्य दुकान तत्काळ प्रभावाने सील केले आहे.














