Khed: तळे म्हसोबाचीवाडी रस्ता तीन ठिकाणी खचला; वाहतूक धोकादायक

मुसळधार पावसामुळे खेड तालुक्यातील रस्त्याची दुरावस्था; आपत्कालीन उपाययोजनांची ग्रामस्थांची मागणी

खेड: खेड तालुक्यातील तळे म्हसोबाचीवाडी येथील रस्ता मुसळधार पावसामुळे तीन ठिकाणी पूर्णपणे खचल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. रस्ता अत्यंत धोकादायक बनला असून, प्रशासनाने तातडीने आपत्कालीन उपाययोजना करून हा मार्ग वाहतुकीसाठी सुरक्षित करावा, अशी जोरदार मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे.

दरडी आणि मलब्यामुळे रहदारी ठप्प; विद्यार्थी अन् वाहनचालक त्रस्त

सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी दरडी आणि मलबा आल्याने हा मार्ग प्रवासासाठी धोकादायक ठरत आहे. काही ठिकाणी रस्ता पूर्णपणे खचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. याचा थेट फटका रोजची ये-जा करणारे ग्रामस्थ, शाळकरी विद्यार्थी आणि वाहनचालकांना बसत असून त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

तात्पुरती मलमपट्टी नको, कायमस्वरूपी प्रश्न सोडवण्याची मागणी

दरवर्षी पावसाळ्यात या रस्त्याची केवळ थातूरमातूर डागडुजी केली जाते. मात्र, रस्त्याची कायमस्वरूपी समस्या दूर करण्यासाठी आवश्यक ती ठोस कामे केली जात नसल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यंदा परिस्थिती अधिक गंभीर असल्याने तातडीने रस्त्यावर आलेला मलबा हटवणे, सुटलेल्या दरडी काढणे, आवश्यक त्या ठिकाणी मोऱ्या टाकणे आणि अस्तित्वात असलेल्या मोऱ्यांवरील गाळ हटवणे अत्यंत गरजेचे आहे.

याशिवाय रस्त्याच्या खालच्या बाजूची माती वाहून जाऊन पुन्हा रस्ता खचू नये यासाठी मोक्याच्या ठिकाणी रिटेनिंग वॉल (संरक्षक भिंत) बांधणे आणि रस्त्याची संरचनात्मक दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. आपत्कालीन कामे तातडीने हाती न घेतल्यास भविष्यात मोठी दुर्घटना किंवा वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून केवळ तात्पुरती डागडुजी न करता रस्त्याचा कायमस्वरूपी प्रश्न सोडवावा, अशी मागणी केली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:35 05-08-2026