Talwade Phata Fire Incident: लांजा–देवरुख मार्गावरील तळवडे फाट्याजवळ धावत्या कारला आग; टोयोटा कार जळून खाक

चालकाच्या प्रसंगावधानाने टळला मोठा अनर्थ; लांजात स्वतंत्र अग्निशामक वाहनाची मागणी पुन्हा अधोरेखित

लांजा: लांजा–देवरुख मार्गावरील तळवडे फाट्यानजीक मंगळवारी रात्री धावत्या टोयोटा कारला अचानक भीषण आग लागून संपूर्ण वाहन जळून खाक झाल्याची घटना घडली. सुदैवाने चालकाने वेळीच प्रसंगावधान राखत वाहनातून बाहेर पडल्यामुळे मोठी जीवितहानी टळली. मात्र, या घटनेमुळे लांजा तालुक्यासाठी स्वतंत्र अग्निशामक वाहनाची आणि यंत्रणेची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

धावत्या कारमधून धूर अन् पाहता पाहता पेट घेतला

मिळालेल्या माहितीनुसार, धनंजय गोपाळ केतकर (वय ६३, रा. मार्लेश्वर फाटा, देवरुख, ता. संगमेश्वर) हे आपल्या टोयोटा कारने (क्रमांक MH 01 FB 3774) लांजाहून देवरुखच्या दिशेने जात होते. रात्री सुमारे ८.१५ वाजण्याच्या सुमारास तळवडे फाट्यानजीक गाडी आली असता, वाहनातून अचानक मोठा आवाज आला आणि धूर निघू लागला. धोका निर्माण झाल्याचे लक्षात येताच केतकर यांनी तत्काळ गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली आणि बाहेर पडले. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण कार आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.

पोलीस आणि स्थानिकांचे मदतकार्य; देवरुखवरून मागवले अग्निशामक वाहन

घटनेची माहिती मिळताच लांजा पोलीस निरीक्षक निलकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार उर्मिला शेडे, पोलीस शिपाई स्वप्निल कदम आणि उमाजी बजागे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. स्थानिक नागरिकांनीही आग विझवण्याचे प्रयत्न केले.

लांजा नगरपंचायतीकडे स्वतःचे अग्निशामक वाहन नसल्याने देवरुख नगरपंचायतीच्या अग्निशामक वाहनाला पाचारण करण्यात आले. देवरुख येथून अग्निशमन दलाच्या जवानांनी पोहोचून आग आटोक्यात आणली, परंतु तोपर्यंत कार पूर्णपणे जळून खाक झाली होती.

लांजा तालुक्यासाठी स्वतंत्र अग्निशमन यंत्रणेची गरज

काही दिवसांपूर्वीच अंजनारी पुलाजवळ ट्रकला आग लागल्याच्या घटनेतही देवरुखच्याच अग्निशामक वाहनावर अवलंबून राहावे लागले होते. आता पुन्हा एकदा तळवडे फाट्यावरील दुर्घटनेमुळे लांजा शहरासह तालुक्यासाठी कायमस्वरूपी स्वतंत्र अग्निशामक वाहन आणि आवश्यक यंत्रणा उपलब्ध करून द्यावी, अशी जोरदार मागणी नागरिकांमधून केली जात आहे. दरम्यान, कारला आग लागण्याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून लांजा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:39 05-08-2026