Agriculture Study Tour Grant: शेतकऱ्यांना परदेशवारीची सुवर्णसंधी! युरोप, चीन अभ्यास दौऱ्यासाठी शासनाचे २ लाखांपर्यंत अनुदान

रत्नागिरी जिल्ह्यातील ५ शेतकऱ्यांना मिळणार संधी; १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज करण्याचे आवाहन

रत्नागिरी / प्रतिनिधी: शेतीमध्ये केवळ उत्पादन वाढविण्यावर समाधान न मानता नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीमालाचा दर्जा सुधारण्यासाठी राज्य सरकारच्या कृषी विभागातर्फे २०२६-२७ या वर्षासाठी ‘शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे’ या राज्य पुरस्कृत योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत Agriculture Study Tour Grant योजनेचा लाभ देत रत्नागिरी जिल्ह्यातील ५ पात्र शेतकऱ्यांना युरोप आणि चीन या देशांच्या अभ्यास दौऱ्यावर जाण्याची संधी उपलब्ध होणार आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी येत्या १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत आपले अर्ज संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जमा करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे.

युरोप आणि चीन दौऱ्यासाठी ५० टक्के किंवा २ लाखांचे अनुदान

जागतिक स्तरावर शेती क्षेत्रात होत असलेले आधुनिक बदल आणि प्रगत तंत्रज्ञान थेट स्थानिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हा या परदेश अभ्यास दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे. या योजनेअंतर्गत निवड झालेल्या शेतकऱ्यांना परदेश दौऱ्यासाठी येणाऱ्या एकूण खर्चाच्या ५० टक्के किंवा जास्तीत जास्त २ लाख रुपये (यापैकी जी रक्कम कमी असेल ती) शासनाकडून अनुदान म्हणून दिले जाणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी एकूण ५ शेतकऱ्यांचा कोटा (लक्ष्यांक) निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये महिला शेतकरी, केंद्र व राज्य स्तरावरील कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी, पीक स्पर्धा विजेते आणि इतर सर्वसामान्य शेतकरी यांचा समावेश असणार आहे.

पात्रतेच्या अटी व अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

दौऱ्यावर जाणाऱ्या शेतकऱ्याचे वय सहलीला निघण्याच्या दिवशी किमान २५ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच शेतकऱ्याच्या उत्पन्नाचे मुख्य साधन शेतीच असावे. संबंधित शेतकरी कोणत्याही शासकीय, निमशासकीय किंवा खासगी संस्थेत नोकरीस नसावा (तसेच तो डॉक्टर, वकील, सीए, अभियंता नसावा). शेतकऱ्याकडे ‘अॅग्रीस्टॅक’ अंतर्गत फार्मर आयडी असणे अनिवार्य आहे. यापूर्वी कोणत्याही शासकीय अर्थसहाय्याने परदेश दौरा केलेला नसावा.

अर्जासोबत जोडायची आवश्यक कागदपत्रे:

  • चालू कालावधीचा (गेल्या ६ महिन्यांतील) ७/१२ आणि ८ अ उतारा
  • आधारकार्ड आणि रेशनकार्डची झेरॉक्स प्रत
  • वैध पासपोर्टची (Passport) झेरॉक्स प्रत
  • एमबीबीएस डॉक्टरांकडून मिळालेले शारीरिक तंदुरुस्ती प्रमाणपत्र (Fitness Certificate) व कोरोना तपासणी अहवाल (निवड झाल्यानंतर)

जिल्ह्यातील सर्व शेतकरी बंधू-भगिनींनी १७ ऑगस्ट २०२६ पूर्वी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:51 05-08-2026