कोकणी मेव्यावर प्रक्रिया करणारे उद्योग उभे राहणार; रत्नागिरी तालुक्यातील ९५ हेक्टर भूसंपादनाचा मार्ग मोकळा
रत्नागिरी:
रत्नागिरी तालुक्यातील निवेंडी येथे प्रस्तावित औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) ९५ हेक्टर भूसंपादनासाठी आवश्यक असलेला १२० कोटी रुपयांचा संपूर्ण निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे गेली दोन वर्षे निधीअभावी रखडलेली भूसंपादनाची प्रक्रिया आता अखेर मार्गी लागली असून, प्रशासकीय स्तरावर वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत.
पालकमंत्री उदय सामंत यांच्या पाठपुराव्याला यश
विधानसभा निवडणुकीपूर्वी निवेंडी परिसरात एमआयडीसी उभारण्याची घोषणा करण्यात आली होती. सुरुवातीला १०५ हेक्टर क्षेत्राचे नियोजन करण्यात आले होते, मात्र नंतर ९५ हेक्टर क्षेत्रावर एमआयडीसी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. आवश्यक निधी उपलब्ध नसल्याने भूसंपादनाची प्रक्रिया खोळंबली होती. उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी या प्रकल्पासाठी विशेष पाठपुरावा केल्यानंतर शासनाने पहिल्या टप्प्यात ६० कोटी रुपये दिले होते. आता उर्वरित ६० कोटी रुपयेही मिळाल्याने भूसंपादनासाठी लागणारा पूर्ण १२० कोटींचा निधी प्राप्त झाला आहे.
स्थानिक शेतकरी व तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी
या एमआयडीसीमध्ये आंबा, काजू, फणस आणि अन्य कोकणी मेव्यावर प्रक्रिया उद्योग उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चांगला बाजारभाव मिळण्यासोबतच स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होणार आहेत. याच परिसरात प्रस्तावित ‘मॅंगो पार्क’ उभारण्याच्या दृष्टीनेही प्रशासकीय हालचाली सुरू असून, भविष्यात येथे मोठ्या प्रक्रिया उद्योगांना आकर्षित करण्याचा शासनाचा मानस आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:51 05-08-2026














