संगमेश्वर वन विभागाची तत्परता; पिंजरा सोडून बिबट्याला सुखरूप बाहेर काढण्यात पथकाला यश
संगमेश्वर:
Leopard Rescue Operation अंतर्गत संगमेश्वर तालुक्यातील साडवली (नैदरवाडी) येथे विहिरीत पडलेल्या एका बिबट्याला वन विभागाच्या पथकाने यशस्वीरित्या जेरबंद करत सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात मुक्त केले आहे. या थरारक आणि यशस्वी रेस्क्यू ऑपरेशनमुळे साडवली परिसरातील ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.
बुधवारी, ५ जुलै २०२६ रोजी सकाळी ९ वाजता साडवली येथील रहिवासी राजेश परशराम चव्हाण यांच्या खासगी विहिरीत एक बिबट्या पडल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. घटनेची माहिती मिळताच परिमंडळ वन अधिकारी संगमेश्वर-देवरुख आणि त्यांचा स्टाफ तातडीने रेस्क्यू साहित्यासह घटनास्थळी दाखल झाला. प्रत्यक्ष पाहणीदरम्यान सुमारे ५ बाय १२ फूट लांबी-रुंदीच्या आणि २० फूट खोल असलेल्या या आयताकृती विहिरीत बिबट्या पाण्यात पोहत असल्याचे निदर्शनास आले. बिबट्या पाण्याच्या बाहेर पडण्यासाठी विहिरीच्या भिंतीचा आधार घेत भिजलेल्या अवस्थेत अडकला होता.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वन कर्मचाऱ्यांनी विलंब न करता तातडीने उपाययोजना आखली. लोखंडी पिंजऱ्याला मजबूत दोरी बांधून तो अत्यंत कौशल्याने विहिरीत खाली सोडण्यात आला. काही क्षणांच्या अथक प्रयत्नांनंतर बिबट्याने स्वतःहून पिंजऱ्यात प्रवेश केला आणि तो सुरक्षितपणे पिंजऱ्यात जेरबंद झाला. यानंतर साडवली येथील तालुका लघु चिकित्सालयाच्या सहायक आयुक्तांकडून बिबट्याची सखोल आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणीत बिबट्याची प्रकृती पूर्णपणे सुस्थितीत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात आले.
हे यशस्वी Leopard Rescue Operation विभागीय वन अधिकारी (रत्नागिरी-चिपळूण) श्रीमती गिरीजा देसाई, सहायक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड आणि परिक्षेत्र वन अधिकारी विक्रम गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. या मोहिमेत वनपाल संगमेश्वर-देवरुख सागर गोसावी, वनरक्षक सहयोग कराडे, आकाश कडुकर, सुरज तेली, सुप्रिया काळे आणि प्राणीमित्र अनुराग आखाडे यांनी मोलाची कामगिरी बजावली. तसेच रेस्क्यू ऑपरेशनदरम्यान साडवलीचे पोलीस पाटील आणि उपस्थित स्थानिक ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:28 06-08-2026














