Illicit Liquor Seized Pali: पालीत हातभट्टीची दारू विक्री; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

१५ लिटर हातभट्टीची दारू जप्त; रत्नागिरी ग्रामीण पोलिसांची कारवाई

रत्नागिरी: तालुक्यातील पाली येथे मुंबई-गोवा महामार्गालगतच्या जंगलमय भागात बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टीची दारू बाळगून तिची विक्री करणाऱ्या एका तरुणाविरुद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई ५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५:५० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

अक्षय विश्वनाथ मावळंकर (वय ३०, रा. खानू गवंडीवाडी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस अंमलदार भैरवनाथ सवाईराम यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

महामार्गालगतच्या जंगलात कारवाई

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ ऑगस्ट रोजी सायंकाळी संशयित आरोपी अक्षय मावळंकर हा पाली नवीन वसाहत भागातील मुंबई-गोवा महामार्गाला लागून असलेल्या जंगलमय भागात बेकायदेशीररीत्या हातभट्टीची दारू विक्रीसाठी बाळगून होता.

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात त्याच्या ताब्यातून १,६५० रुपये किमतीची १५ लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली. याप्रकरणी संशयिताविरुद्ध दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:01 07-08-2026