Mumbai Goa Highway: यंदाच्या गणेशोत्सवात चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होणार; पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला विश्वास

मुंबई-गोवा महामार्ग कामाचा आढावा आणि कशेडी घाटातील भूस्खलनावर अभ्यास समितीची घोषणा

रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्ग कामाचा वेग पाहता यंदाच्या गणेशोत्सवात कोकणात येणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास अत्यंत सुखकर आणि गतिमान होणार असल्याचा ठाम विश्वास रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे. रत्नागिरीत पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी महामार्गाच्या सद्यस्थितीची सविस्तर माहिती दिली. सध्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम बहुतांश पूर्ण झाले असून, रत्नागिरीतून अवघ्या साडेचार ते पाच तासांत पनवेल गाठणे शक्य होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महामार्गावरील केवळ काही मोजक्या ठिकाणचे टप्पे अर्धवट असून, तेदेखील सणापूर्वी वाहतुकीयोग्य करण्याचे नियोजन प्रशासनाकडून केले जात आहे.

इंदापूर ते लांजा टप्प्यातील महामार्ग कामाची प्रगती

महामार्गावरील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या इंदापूर आणि माणगाव येथील बायपासच्या भूसंपादनाचे प्रश्न आता मार्गी लागले असून तेथील कामे वेगाने सुरू आहेत. महाड ते आरवली दरम्यानचा मार्ग पूर्ण झाला असून, सध्या रत्नागिरी जिल्ह्यात आरवली ते लांजा या टप्प्यामध्ये कामे प्रगतिपथावर आहेत.

विशेषतः लांजा ते हातखंबा या भागातील रस्ता पूर्ण झाला असून, लांज्यातील पुलाचे काम अंतिम टप्प्यात वेगाने सुरू आहे. याशिवाय चिपळूण येथील उड्डाणपुलाच्या कामालाही गती देण्यात आली असून, गणपतीपूर्वी हे सर्व महत्त्वाचे टप्पे सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

रत्नागिरी-कोल्हापूर मार्गामुळे वेळ वाचणार

कोकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणाऱ्या रत्नागिरी-कोल्हापूर मार्गाबद्दल बोलताना पालकमंत्र्यांनी सांगितले की, सध्या रत्नागिरी ते आंबा घाट हे अंतर अवघ्या पाऊण ते एक तासात पार करता येते. या मार्गावरील मलकापूर आणि बांबवडे येथील बायपासची कामे सध्या सुरू आहेत. ही कामे पूर्ण झाल्यानंतर रत्नागिरीहून कोल्हापूरला पोहोचण्यासाठी केवळ दीड ते पावणेदोन तासांचा वेळ लागेल.

Fitness

कशेडी घाटातील भूस्खलनावर अभ्यास समितीची स्थापना

कशेडी घाटात दरड कोसळल्याच्या चर्चांवर स्पष्टीकरण देताना उदय सामंत यांनी सांगितले की, घाटात प्रत्यक्ष असा कोणताही प्रकार घडलेला नव्हता. मुख्य रस्त्यापासून सुमारे २०० मीटर अंतरावर एक डोंगर घसरल्यामुळे त्याची माती आणि दरड रस्त्यावर आली होती. या मार्गावर वारंवार होणाऱ्या अशा भूस्खलनाच्या घटनांवर तांत्रिक अभ्यास करण्यासाठी एक स्वतंत्र अभ्यास समिती नेमली जाणार आहे. ही समिती भूस्खलनाच्या कारणांचा अभ्यास करून अहवाल सादर करेल आणि त्यानंतर आवश्यक सुधारणा केल्या जातील.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:14 08-08-2026