अॅपच्या माध्यमातून खात्यात फेरफार करून फसवणूक; अज्ञात सायबर भामट्यावर गुन्हा नोंद
रत्नागिरी: मोबाईल फोनमध्ये एक अॅप डाऊनलोड करून त्याद्वारे स्वातंत्र्यदिनाचे शुभेच्छा कार्ड तयार करणे एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला भलतेच महाग पडले आहे. अॅपच्या माध्यमातून सायबर भामट्यांनी त्यांच्या बँक खात्यावर डल्ला मारत तब्बल ८ लाख ६२ हजार ४०० रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना रत्नागिरी शहरात समोर आली आहे. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ग्रीटिंग कार्ड तयार करून अॅप केले अनइन्स्टॉल; तरीही सायबर चोरट्यांचा डल्ला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर येथील इंडसइंड बँकेच्या शाखेच्या हद्दीत घडला. या प्रकरणी १७ ऑगस्ट रोजी दुपारी शहर पोलिसांत तक्रार दाखल झाली आहे. टिळक आळी येथील सोहम अपार्टमेंटमध्ये राहणारे सुहास दिगंबर सोहनी (वय ६१) हे सेवानिवृत्त आहेत. त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये एक क्रिप्टो अॅप डाऊनलोड केले होते. या अॅपच्या मदतीने स्वातंत्र्यदिनाचे शुभेच्छा कार्ड तयार केल्यानंतर त्यांनी ते अॅप मोबाईलमधून अनइन्स्टॉल देखील केले होते.
एफडीची रक्कम बचत खात्यात वळवून लांबवली
मात्र, अज्ञात सायबर भामट्यांनी तंत्रज्ञानाचा गैरवापर करत फिर्यादी सोहनी यांच्या इंडसइंड बँकेतील मुदत ठेवीच्या (FD) खात्यात फेरफार केली. सायबर भामट्यांनी एफडीच्या खात्यावरील एकूण ८ लाख ६२ हजार ४०० रुपये प्रथम सोहनी यांच्याच बचत खात्यात (Savings Account) वळवले आणि त्यानंतर ती संपूर्ण रक्कम ऑनलाईन पद्धतीने चोरून त्यांची मोठी आर्थिक फसवणूक केली.
पोलिसांकडून भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सुहास सोहनी यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८(४) सह माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) कलम ६६(क) व ६६(ड) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या सायबर गुन्ह्याचा पुढील अधिक तपास पोलीस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:55 18-08-2026














