मोहल्ले, घरे आणि दर्गे सजले; सजावटीच्या साहित्याला बाजारात मोठी मागणी
रत्नागिरी:
Eid Milad Ratnagiri उत्सव साजरा करण्यासाठी रत्नागिरी शहरासह संपूर्ण जिल्ह्यात मुस्लिम बांधवांची जय्यत तयारी सुरू झाली आहे. इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभरात साजरा केला जाणारा ईद-ए-मिलाद (मिलाद-उन-नबी) सण रत्नागिरीत मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर येत्या १६ सप्टेंबर रोजी शहरासह तालुक्यात सकाळी ८:३० वाजता ईदचा भव्य जुलूस (मिरवणूक) काढण्यात येणार आहे.
शहरात विविध मार्गांवरून निघणार मिरवणूक
रत्नागिरी शहरातील या मुख्य मिरवणुकीचे नियोजन दावते इस्लामी शाखा रत्नागिरीच्या वतीने करण्यात आले आहे. ही मिरवणूक सकाळी ८:३० वाजता कोकणनगर येथून सुरू होईल. त्यानंतर मारुती मंदिर, उद्यमनगर, चंपक मैदान मार्गे जात कोकणनगर येथेच या जुलूसचा समारोप होणार आहे. या धार्मिक मिरवणुकीमध्ये मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन दावते इस्लामी शाखा रत्नागिरीचे अध्यक्ष अल्ताफ कुरेशी यांनी केले आहे.
बाजारपेठेत सजावटीच्या साहित्याची मोठी मागणी
ईदच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीतील मोहल्ले, घरे आणि दर्गे विद्युत रोषणाईने उजळून निघाले आहेत. घरावर लहान-मोठे हिरवे झेंडे आणि माळा लावून सजावट करण्यात आली आहे. खरेदीसाठी रत्नागिरी शहरातील मोहल्ला व सैतवडे या भागांसह लांजा, दापोली, चिपळूण आणि राजापूर येथील बाजारपेठांमध्ये सजावटीचे साहित्य विक्रीसाठी दाखल झाले आहे. यामध्ये चंद्र आकाराचे पताके, लहान-मोठे हिरवे झेंडे, मक्का-मदिनाचे फोटो असलेले झेंडे आणि विविध प्रकारच्या लाईटिंगचा समावेश असून, खरेदीसाठी नागरिकांची गर्दी दिसून येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:13 21-08-2026














