Sindhuratna Samruddha Yojana Logo Competition: ‘सिंधुरत्न समृद्ध योजना २.०’ साठी जिल्हास्तरीय लोगो स्पर्धा; विजेत्यास १० हजारांचे पारितोषिक

रत्नागिरीची निसर्गसंपदा व संस्कृती दर्शवणारे बोधचिन्ह पाठवण्याचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे आवाहन

Sindhuratna Samruddha Yojana Logo Competition अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा देणाऱ्या ‘सिंधुरत्न समृद्ध योजना २.०’ च्या प्रभावी ओळखीसाठी जिल्हा प्रशासनाने जिल्हास्तरीय लोगो (बोधचिन्ह) निर्मिती स्पर्धेची घोषणा केली आहे. जिल्ह्याच्या समृद्ध निसर्ग आणि संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणारे मानचिन्ह साकारणाऱ्या विजेत्यास १० हजार रुपयांचे रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील कल्पक नागरिक, विद्यार्थी, तरुण कलाकार आणि ग्राफिक डिझायनर्सनी या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले आहे.

लोगो डिझाइनचे निकष आणि आवश्यक बाबी

  • रत्नागिरीची ओळख: तयार करण्यात येणाऱ्या लोगोमध्ये अरबी समुद्र, समृद्ध मत्स्यव्यवसाय, बंदरे, सह्याद्रीची हिरवाई, पर्यटन, हापूस आंबा, कोकणी संस्कृती, आधुनिक उद्योजकता आणि शाश्वत विकास या घटकांचे प्रतिबिंब उमटणे आवश्यक आहे.
  • तांत्रिक तपशील: लोगो JPG किंवा PNG फॉरमॅटमध्ये पाठवावा. (शक्य असल्यास AI, CorelDRAW, PDF, EPS किंवा Vector फाइल सोबत जोडावी).
  • स्पष्टीकरण टिपण: लोगोचा अर्थ आणि त्यामागील संकल्पना स्पष्ट करणारे १०० ते १५० शब्दांचे टिपण जोडणे अनिवार्य राहील.
  • मूल्यांकन निकष: मौलिकता, आकर्षक रंगसंगती, साधेपणा आणि योजनेच्या उद्दिष्टांशी सुसंगतता या निकषांच्या आधारे १०० गुणांमधून परीक्षण केले जाईल.
  • नियम व अटी: डिझाइन पूर्णपणे मूळ (Original) असावे. कोणत्याही प्रकारची कॉपी आढळल्यास प्रवेशिका बाद ठरेल. राजकीय, धार्मिक भावना दुखावणारे घटक किंवा अधिकृत शासकीय राजमुद्रा वापरण्यास मनाई आहे. निवडलेल्या लोगोचे सर्वाधिकार ‘सिंधुरत्न कार्यकारी समिती’कडे राखीव राहतील.

अंतिम मुदत आणि अर्ज सादर करण्याचा पत्ता

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तयार केलेले लोगो dporatnagiri@gmail.com या ईमेलवर पाठवावेत किंवा ‘जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी’ येथे प्रत्यक्ष आणून द्यावेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:28 21-08-2026