देवरूख पोलीस ठाण्याबाहेर ग्रामस्थांचा दिवसभर ठिय्या; चिरा वाहून नेणाऱ्या ओव्हरलोड वाहनांवर कारवाई करण्याची मागणी
सादवली / देवरूख:
संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब-ताम्हाणे मार्गावर झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या आंबवली मराठवाडी येथील प्रतीक सावंत या तरुणाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. बेदरकारपणे चिरा वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकावर आणि मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी मृत प्रतीकाचे नातेवाईक आणि आंबवली पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी गुरुवारी दिवसभर देवरूख पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला होता. मागणी मान्य होईपर्यंत प्रतीकाचा मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी ठाम नकार दिला होता.
तहसील कार्यालयात बैठक आणि आंदोलकांची आक्रमक भूमिका
गुरुवारी सकाळपासूनच देवरूख पोलीस ठाण्याच्या आवारात नातेवाईक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने गोळा झाले होते. हा केवळ अपघात नसून घातपात असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला. या पार्श्वभूमीवर देवरूख तहसीलदार कार्यालयात महत्त्वाची बैठक पार पडली. पावसात आणि ओव्हरलोड गाड्या धावत असतानाही महसूल प्रशासनाकडून अवैध चिरा वाहतुकीवर कारवाई का होत नाही, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी केला.
दुपारनंतर पुन्हा पोलीस ठाण्यात नातेवाईकांनी आपली मागणी एकमुखी लावून धरली.
उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचे आश्वासन आणि तोडगा
परिस्थिती तणावपूर्ण बनल्यानंतर पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांनी बाहेर येऊन ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे व ट्रक मालकाविरुद्ध कोर्टात खटला दाखल केल्याचे स्पष्ट केले. मात्र नातेवाईक मालकावरही कठोर कलमे लावण्याच्या मागणीवर ठाम होते.
तणावाच्या वातावरणात उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांनी मध्यस्थी केली:
- चौकशीचे आश्वासन: “नातेवाईक आणि ग्रामस्थांनी आपले लेखी म्हणणे मांडून पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेज द्यावेत. त्याप्रमाणे तपास केला जाईल,” असे त्यांनी सांगितले.
- कठोर कलमे लावणार: तपासात घातपात आढळल्यास त्यानुसार योग्य ती गंभीर कलमे जोडली जातील, असे आश्वासन कदम यांनी दिल्यानंतर वादावर पडदा पडला.
अखेर पोलिसांच्या आश्वासनानंतर नातेवाईकांनी शांततेची भूमिका घेत प्रतीकाचा मृतदेह ताब्यात घेतला. या आंदोलनादरम्यान जि. प. माजी सदस्य रोहन बने, जि. प. सदस्य संतोष थेराडे, भाजप तालुका अध्यक्ष रूपेश कदम, आंबवली सरपंच दीप्ती सावंत, नंदादीप बोरूकर, अमोल गायकवाड यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:43 22-08-2026














