Iphone Dispute Suicide Chhatrapati Sambhajinagar: आयफोनच्या हप्त्यांवरून वाद; मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही खवड्या डोंगरावरून कोसळून मृत्यू

छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगरावरील हृदयद्रावक घटना; अकरावीत शिकणाऱ्या ९२ टक्के गुण मिळालेल्या मुलाच्या हट्टापोटी संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त

छत्रपती संभाजीनगर: आयफोनच्या हप्त्यांवरून आणि खर्चाच्या पैशांवरून घरात झालेल्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांनी डोंगरावरून उडी मारून आत्महत्या केल्याची सुन्न करणारी घटना छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगरावर घडली आहे. मुलाने घेतलेल्या टोकाच्या निर्णयामुळे त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात आई आणि वडिलांचाही दुर्दैवी अंत झाला असून, या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

काय घडले नक्की?

मूळचे जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील धनगर पिंपळवाडी येथील असलेले चांदगुडे कुटुंब गेल्या १८ वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर शहरात वास्तव्यास होते. दहावीत ९२ टक्के गुण मिळवून नुकताच अकरावीत प्रवेश घेतलेला कुणाल चांदगुडे याला डॉक्टर व्हायचे होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून वडिलांसोबत त्याचे वाद होत होते. वडील खर्चाला पैसे देत नाहीत आणि त्याने घेतलेल्या आयफोनचे हप्ते थकल्याची सल त्याच्या मनात होती.

याच रागातून कुणाल शुक्रवारी दुपारी आत्महत्या करण्यासाठी खवड्या डोंगरावर पोहोचला. ही माहिती मिळताच त्याचे आई-वडील आणि अग्निशमन दलाची गाडी तातडीने घटनास्थळी पोहोचली.

“तुझ्या वडिलांना सोडून येते, पण तू जाऊ नकोस” — आईची आर्त हाक

डोंगराच्या अत्यंत उंच आणि धोकादायक कड्यावर उभ्या असलेल्या कुणालची समजूत घालण्यासाठी त्याच्या आई-वडिलांनी तब्बल तीन तास प्रयत्न केले. कुणालने त्याच्याजवळील आयफोन, हातातील घड्याळ आणि गळ्यातील साखळी काढून फेकून दिली होती. “आई, माझं कोणीच ऐकत नाही, मला जगण्यात रस नाही, माझ्या लाईफचे सोल्युशनच नाही,” असे तो सतत म्हणत होता.

त्यावेळी व्याकुळ झालेल्या आईने, “तुझे पप्पांसोबत वाद आहेत ना? हे बघ, मी आत्ता मंगळसूत्र काढून फेकते, तुझ्या वडिलांना सोडून देते, तुझ्यासोबत येते, आपण दोघे राहू… पण मला सोडून जाऊ नकोस,” अशी आर्त हाक मारून त्याला विनवले.

क्षणात कुटुंब संपले

डोंगराच्या कड्यावर उभ्या असलेल्या कुणालला मागे खेचण्याच्या आणि रोखण्याच्या प्रयत्नात वडिलांचा तोल गेला आणि दोघेही खोल दरीत कोसळले. डोळ्यांदेखत पती आणि मुलाचा असा अंत झालेला पाहून आईला हा प्रचंड धक्का सहन झाला नाही. तिनेही त्याच क्षणी डोंगरावरून खाली उडी घेतली. एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:17 22-08-2026