Ratnagiri Voter List Revision: रत्नागिरी जिल्ह्यात १ लाख ३१ हजार ५९६ मतदारांची नावे वगळणार; ४ नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार अंतिम यादी

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ४३,५६९ नावांचा समावेश; एसएसआयआर उपक्रमांतर्गत शंभर टक्के डिजिटल स्क्रूटनी पूर्ण

रत्नागिरी:

विशेष सखोल पुनरीक्षण (SSIR) उपक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील मतदारांचे डिजिटायझेशन पूर्ण झाले असून अर्जांची पडताळणी केल्यानंतर १ लाख ३१ हजार ५९६ मतदारांचे अर्ज पुन्हा बीएलओकडे जमा न झाल्याने ही नावे मतदार यादीतून वगळली जाणार आहेत. यात सर्वाधिक ४३ हजार ५६९ नावे ही एकट्या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील आहेत. निवडणूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार सुधारित वेळापत्रकानुसार अंतिम मतदार यादी ४ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे.

डिजिटायझेशनचे काम १०० टक्के पूर्ण

एसएसआयआर (SSIR) कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी जिल्ह्यात १३ लाख २९ हजार ४२ मतदारांची नोंद होती. गृहभेटीदरम्यान या सर्वांना अर्जांचे वाटप करण्यात आले होते. १७ ऑगस्टपर्यंत चाललेल्या या मोहिमेत जिल्ह्यातील ५ विधानसभा मतदारसंघांमधील ११ लाख ९७ हजार ४४६ मतदारांचे डिजिटायझेशन पूर्ण करण्यात आले आहे. १ लाख ३१ हजार ५९६ मतदारांनी अर्ज जमा न केल्याने ही नावे यादीतून वगळण्यात येत आहेत.

मतदारसंघांनुसार वगळण्यात येणाऱ्या नावांची आकडेवारी

  • रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ: ४३,५६९ नावे
  • दापोली विधानसभा मतदारसंघ: २५,६४३ नावे
  • गुहागर विधानसभा मतदारसंघ: १९,८८९ नावे
  • चिपळूण विधानसभा मतदारसंघ: २५,३८६ नावे
  • राजापूर विधानसभा मतदारसंघ: १७,९०९ नावे

नवमतदारांसाठी ऑनलाईन अर्जाची संधी आणि पुढील वेळापत्रक

प्रारूप मतदार यादी ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर दरम्यान दावे व हरकती नोंदवण्यासाठी कालावधी देण्यात आला आहे. ज्या मतदारांची नावे वगळली गेली असतील किंवा ज्यांनी १ ऑक्टोबर २०२६ पर्यंत वयाची १८ वर्षे पूर्ण केली असतील, ते ऑनलाईन पद्धतीने अर्ज क्रमांक ६ भरून मतदार यादीत नाव नोंदवू शकतात.

३१ ऑगस्ट ते २९ ऑक्टोबर दरम्यान हरकती निकाली काढण्याची कारवाई चालणार असून, अंतिम मतदार यादी ४ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाईल. मतदार यादीतील नावे तपासण्यासाठी, ऑनलाइन नोंदणीसाठी किंवा अधिक माहितीसाठी नागरिक voters.eci.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:05 22-08-2026