Ladki Bahin Yojana Fake Beneficiaries: ‘लाडकी बहीण’ योजनेत कोट्यवधींचा घोळ? आरटीआयमधून धक्कादायक माहिती समोर

९२ लाख अपात्र लाभार्थ्यांच्या खात्यात तब्बल ९,६०५ कोटी रुपये वर्ग; ४.५ लाख सरकारी कर्मचाऱ्यांकडून होणार रक्कम वसूल

मुंबई:

राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’बाबत (Ladki Bahin Yojana) एक अत्यंत धक्कादायक आणि महत्त्वाची माहिती समोर आली आहे. माहिती अधिकारातून (RTI) मिळालेल्या आकडेवारीनुसार, जून २०२६ पर्यंत राज्यातील तब्बल ९२ लाख अपात्र लाभार्थ्यांच्या खात्यात एकूण ९,६०५ कोटी रुपये ट्रान्स्फर झाल्याचे उघडकीस आले आहे. सरकारने आता या अपात्र लाभार्थ्यांची छाटणी केली असून ६२ लाख लाभार्थ्यांना यादीतून वगळले आहे.

ई-केवायसी (e-KYC) न केल्याने सर्वाधिक लाभार्थी अपात्र

योजनेतील सत्यता पडताळणीनंतर अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. ६२ लाख लाभार्थ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे त्यांना यादीतून हटवण्यात आले आहे. तर १६ लाख लाभार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त असल्याचे निष्पन्न झाले. याव्यतिरिक्त ४.५ लाख सरकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांनीही या योजनेचा बेकायदेशीर लाभ घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांची आकडेवारी (प्रमाण)

  • ई-केवायसी न केलेले: ६२ लाख लाभार्थी.
  • उत्पन्न मर्यादा (२.५ लाख) ओलांडलेले: १६ लाख कुटुंबे.
  • सरकारी कर्मचारी व अधिकारी: ४.५ लाख.
  • संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी: ३.६ लाख महिला.
  • एकाच कुटुंबातील अनेक नोंदी: २.५ लाख प्रकरणे.
  • ६५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेले: १.८ लाख लाभार्थी.
  • जिल्हास्तरीय चौकशीत अपात्र: १.७ लाख इतर.

केवळ सरकारी कर्मचाऱ्यांकडून होणार रक्कम वसूल

महिला व बालविकास विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वसामान्य अपात्र महिलांकडून कोणतीही वसुली केली जाणार नाही. मात्र, ज्या ४.५ लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी या योजनेचा गैरफायदा घेतला आहे, त्यांच्याकडून पूर्ण रक्कम वसूल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

सध्या या योजनेचा लाभ १.६५ कोटी महिला घेत असून, गेल्या २४ महिन्यांत सरकारने या योजनेसाठी एकूण ७६,२६१ कोटी रुपये खर्च केले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:59 22-08-2026