Ratnagiri : कुर्ली समुद्रात ट्रॉलर नौका भरकटली; सहायक मत्स्य व्यवसाय विभागाकडून पंचनामा

समुद्रात अलरिझवान नौकेचे इंजिन बंद; किनाऱ्यावर रुतलेल्या नौकेचे नुकसान

खवळलेल्या समुद्रात मासेमारी धोक्याची; मत्स्य आयुक्त जे. डी. सावंत यांचे आवाहन

रत्नागिरी :

रत्नागिरी शहरालगतच्या कुर्ली समुद्रात मासेमारी करणारा ट्रॉलर नौकेचे इंजिन बंद पडल्याने आणि वाऱ्यामुळे भरकटत किनाऱ्यालगत येऊन अडकून पडला आहे. या नौकेच्या नुकसानीचा आणि घटनेचा प्राथमिक पंचनामा सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभागाचे परवाना अधिकारी चिन्मय जोशी व पथकाकडून करण्यात आला आहे. परंतु, या नौकेचे प्रत्यक्ष किती नुकसान झाले आहे, हे ती नौका पाण्यातून बाहेर काढल्यानंतरच स्पष्ट होऊ शकणार आहे.

जाळे पंख्यात अडकल्याने इंजिन बंद कुर्ली समुद्रात ‘अलरिझवान’ नावाची ही नौका शनिवारी मासेमारी करत होती. मासेमारी करत असताना समुद्रात टाकलेले जाळे नौकेच्या पंख्यात अचानक अडकले, ज्यामुळे नौकेचे इंजिन बंद पडले. इंजिन बंद पडल्याने ही नौका तीव्र वाऱ्यामुळे भरकटत गेली आणि किनाऱ्याजवळ येऊन रुतून बसली. वाऱ्याने भरकटत येत असताना खडकावर आदळल्याने ही नौका खालच्या बाजूने फुटली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

नौकेवरील खलाशी ठरले सुदैवी इंजिन बंद पडल्यामुळे भरकटत आलेली ही नौका महम्मदमिया इब्राहिम मस्तानी यांच्या मालकीची आहे. घटनेच्या वेळी या नौकेवर एकूण ७ खलाशी उपस्थित होते. सुदैवाने, वाऱ्याच्या दिशेने नौका किनाऱ्यावर लागल्याने सर्व ७ खलाशी सुखरूप वाचले असून कोणतीही जीवितहानी किंवा अनर्थ घडलेला नाही.

मत्स्य व्यवसाय विभागाचे आवाहन सध्या समुद्र खवळलेला असल्याने आणि हवामान प्रतिकूल असल्याने मच्छीमारांनी खबरदारी बाळगणे आवश्यक आहे. समुद्रातील वातावरण पूर्णपणे शांत झाल्याशिवाय मच्छीमारांनी आपल्या नौका मासेमारीसाठी समुद्रात घालू नयेत, असे आवाहन सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त जे. डी. सावंत यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:37 24-08-2026